File Photo : RG Kar Hospital
कोलकाता : कोलकाता येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता याप्रकरणात महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. आरजी कार मेडिकल कॉलेजच्या 45 पेक्षा जास्त वरिष्ठ डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.
आरजी कारच्या वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे न्यायासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. सध्या उपोषणाला बसलेल्या आंदोलक डॉक्टरांची प्रकृती खालावली आहे. आम्ही वरिष्ठ डॉक्टर सामूहिक राजीनामे देत आहोत, कारण सरकार उपोषणावर असलेल्या डॉक्टरांच्या बिघडलेल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत आहे आणि जर इतर काही मागणी झाल्यास आम्ही वैयक्तिक राजीनामे देखील देऊ’.
तसेच प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरांच्या मागण्या अपूर्ण राहिल्याने, प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या अत्याचारप्रकरणी तपासात प्रगती होत नसल्याचा दावा करत त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरांचे उपोषण सुरुच
डॉक्टरांच्या आणखी एका संघटनेने, जॉइंट प्लॅटफॉर्म ऑफ डॉक्टर्स (जेपीडी) ने देखील त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांच्या समर्थनार्थ एक निवेदन जारी केले आहे. आरजी कार अत्याचार-हत्या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी दुर्गापूजा उत्सवादरम्यान मंगळवारी सलग चौथ्या दिवशी प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरांनी बेमुदत उपोषण सुरू ठेवले आहे.