मराठी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' कमाई!
सध्या सगळीकडे धुरंधरची चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. यातच एक मराठी चित्रपट रिलीज झाला, जो धुरधंर सारखा चित्रपट समोर असताना सुद्धा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. हा चित्रपट म्हणजे ‘उत्तर’.
उत्तर हा मराठी चित्रपट आई-मुलाच्या सुंदर नात्यावर बनलेला चित्रपट आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे आणि ऋता दुर्गुळे यांची मुख्य भूमिका आहे. गीतकार आणि लेखक क्षितिज पटवर्धन यांनी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात आपले पहिले पाऊल ठेवले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. तसेच वेळोवेळी, क्षितिज पटवर्धन या चित्रपटाच्या यशाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळाला, याबद्दल क्षितिजने इंस्टग्रामवर एक पोस्ट केली आहे.
क्षितिज पटवर्धन यांनी दादरमधील एका थिएटरमधील फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की,“तुम्ही आमची पहिली सकाळच सुंदर केलीत! काल रात्री अचानक आज सकाळी 10 वाजताचा शो दादरमध्ये मिळाला. या शोची कुठेही पेपरमध्ये जाहिरात नव्हती, फक्त ऑनलाइन माहिती होती. वर्षाच्या पहिल्या सकाळी प्रेक्षक येतील का, अशी शंका मनात होती, पण प्रेक्षकांनी तो विचार करण्याचीही संधी दिली नाही. कारण ते आले—आणि केवळ आले नाहीत, तर मोठ्या संख्येने आले. चौथा आठवडा सुरू करताना आजच्या प्रेक्षकांनी आम्हाला चौपट उत्साह दिला. नव्या वर्षाची सुरुवात प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने झाली. सकाळच्या वेळेला एवढी गर्दी पाहून थिएटरमधील स्टाफही खूप आनंदी झाला होता.”**
sacnilk च्या अहवालानुसार, ‘उत्तर’ सिनेमाने 20 दिवसात 2.25 कोटींची कमाई केली आहे. ‘उत्तर’ला मिळालेला हा प्रतिसाद आता अजूनच वाढताना दिसत आहे.






