नवी दिल्ली: यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्यात आले होते. लोकसभा व राज्यसभा अशा संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित देखील करण्यात आले. दरम्यान या विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज सुनावणी करताना असताना कोर्टाने या कायद्याला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यावर आता असदुद्दीन ओवैसींनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?
आताच यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होईपर्यंत केंद्रीय वक्फ बोर्ड, राज्य वक्फ बोर्डावर कोणतीही नियुक्ती न करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही वक्फ कायद्याला असंवैधानिक मानतो. अनुच्छेद २५,२६, १५ आणि २९ चे हे उल्लंघन आहे. असे मी आधीपासूनच म्हणत आलो आहे. आजही मी तेच म्हणत आहे.
प्रकरण काय?
वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. हा मोदी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत केंद्र सरकारला सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. वक्फ बोर्ड सुधारित कायद्याबाबत 5 मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे. वक्फ बोर्ड सुधारित कायद्याच्या विरोधात विरोधी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. वक्फ बोर्डच्या विरोधात 70 हून अधिक याचिका दाखल करण्यात आले आहे. यावर एकत्रित सुनावणी पार पडली.
सुप्रीम कोर्टाची निरीक्षणे काय?
वक्फ कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या कायद्यात काही तरतूदी आहेत. या कायद्यावर पूर्णपणे स्थगिती देणे अशक्य आहे. जो पर्यन्त हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तोवर स्थिती जैसे थे ठेवावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
वक्फ सुधारणा कायद्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
वक्फ कायद्याच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलनाची लाट पसरली असून, मुर्शिदाबाद जिल्ह्यातील विविध भागांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. सुती, धुलियान, शमशेरगंजसह जांगीपूर, अमटला आणि चापदानी या भागांमध्ये हिंसाचार, तोडफोड आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेला हिंसाचार शनिवारी सकाळी पुन्हा एकदा उफाळून आला. धुलियान आणि शमशेरगंज भागात शांततेचा भंग झाला असून, गोळीबाराच्या घटनाही समोर आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत एकूण चार जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यामध्ये गोलाम मोहिउद्दीन शेख (21) आणि हसन शेख (12) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.