File Photo : Accident
राजस्थानच्या सीकरमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेल्या एका खासगी बसचं लक्ष्मणगढ़ पुलावर नियंत्रण सुटून बस थेट पुलाच्या भिंतीला धडकली. यात १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ३० प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ भागात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस सालारवरून निघाली होती. दरम्यान लक्ष्मणगढ़ पुलावर आल्यानंतर बस चालकाच बसवरचं नियंत्रण सुटलं आणि बस थेट पुलाला जाऊन धडकली. यात बस चालकाच्या बाजूच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. बसमध्ये किमान ४० प्रवासी होते. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं आणि तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
मात्र यातील १० प्रवाशांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अन्य ३० प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघात कसा झाला. याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नसून पोलीस तपास करत आहेत. टीव्ही ९ हिंदीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
या अपघातात बसच्या समोरील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. घटनास्थळी असलेल्या लोकांनी तात्काळ या अपघाताची माहिती पोलिसांना दिली आणि तात्काळ बचाव कार्य सुरू केले. माहिती मिळताच सीकर शरह पोलीस आयुक्त डीएसपी शाहीन सी आणि एडीएम रतन कुमार घटनास्थळी दाखल झाले आणि अपघात कसा घडला याचा तपास सुरू केला. सीकरचे एसपी भुवन भूषण यादव यांच्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय 20 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत. बसमध्ये 40 पेक्षा अधिक लोक प्रवास करत होते, अशी माहिती त्यांनी दिली.