India Chaina Relations (Photo Credit- X)
India China Relation: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे (Tax) भारत आणि चीन (India-China) यांच्यातील संबंधात सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. लवकरच दोन्ही देशांमध्ये मोठा व्यापार करार होण्याची शक्यता आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, भारत आणि चीनसाठी भागीदारी हाच योग्य मार्ग आहे. यामुळे दोन्ही देशांना मोठा फायदा होईल. त्यांनी सांगितले की, ग्लोबल साउथ (Global South) चे भारत आणि चीन हे दोन्ही महत्त्वाचे सदस्य आहेत आणि विकसनशील देश म्हणून त्यांचे हितसंबंध समान आहेत. भारत आणि चीन योग्य मार्गाने आपापसातील मतभेद दूर करून एकत्रितपणे काम करण्यास तयार आहेत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील एससीओ (SCO) बैठकीत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. या उच्चस्तरीय भेटींमुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील आगामी बैठका खूप सकारात्मक असतील, अशी आशा दोन्ही बाजूंकडून व्यक्त केली जात आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनीही यावर आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, भारत आणि चीन यांच्यात सीमा व्यापार (Border Trade) पुन्हा सुरू करण्याची योजना आहे. या संदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.
उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड (Lipulekh Pass)
हिमाचल प्रदेशातील शिपकी ला खिंड (Shipki La Pass)
सिक्कीममधील नाथू ला खिंड (Nathu La Pass)
या तिन्ही खिंडीतून यापूर्वीही दोन्ही देशांमध्ये व्यापार होत होता. आता पुन्हा एकदा या मार्गांनी व्यापार सुरू करण्यासाठी चीनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. या व्यापारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना आणखी बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
कोविड-१९ च्या सुरुवातीपासूनच भारत आणि चीनमधील थेट हवाई सेवा बंद करण्यात आली होती. आता भारतीय विमान कंपन्यांना पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी पुनर्संचयित होईल आणि आर्थिक आणि राजनैतिक संबंध मजबूत होतील.