उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपची उद्या दिल्लीत खलबतं; 'या' नावांवर होणार चर्चा
NDA Meeting: भारतीय जनता पक्षाने उद्या (१७ ऑगस्ट) रोजी त्यांच्या संसदीय मंडळाची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. भाजपच्या सर्वोच्च संघटनात्मक संस्थेने, संसदीय मंडळाने ही बैठक बोलावली असून या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सायंकाळी सहा वाजता, दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात ही बैठक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर चर्चा कण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. यासोबतच उपराष्ट्रपतीपदाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नामांकन रणनीतीवरही चर्चा केली जाणार आहे. २१ ऑगस्ट रोजी एनडीए आपल्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे.
भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेस पक्षात प्रवेश
भाजप नेतृत्त्वाने देशभरातील सर्व भाजपशासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांनाही या बैठकीसाठी दिल्लीत निमंत्रण दिले आहे. महायुतीच्या युतीची एकता आणि ताकदीचा संदेश देशभरात पोहचवा या उद्देशाने सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत. या सगळ्यात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अलीकडेच एक सूचक विधान केले होते. पंतप्रधान मोदी आणि जे.पी. नड्डा एकत्रितपणे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए उमेदवाराची अंतिम निवड करणार आहेत. संसद भवनात एनडीए नेत्यांची बैठकीदरम्यान त्यांनी यावर भाष्य केले होते. या बैठकीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, लल्लन सिंह, अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यासारखे प्रमुख नेतेही उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे आणि त्याची छाननी २२ ऑगस्ट रोजी केली जाईल आणि नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. २१ जुलै रोजी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यानंतर उद्या उपराष्ट्रपती पदाबाबतची बैठक होत आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. जो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तात्काळ स्वीकारला. पण त्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांसारख्या काही विरोधी नेत्यांनी या राजीनाम्यामागे इतर कारणे असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
एनडीएने अद्याप कोणत्याही उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. पण त्यातही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची नावे संभाव्य चेहऱ्यांमध्ये चर्चेत आहेत.तर दुसरीकडे, विरोधी आघाडी इंडिया देखील एक समान उमेदवार शोधत आहे आणि त्यासाठी चर्चा सुरू आहे. तथापि, त्यांचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.