Faissal Khan Aamir Khan (Photo Credit -X)
Faissal Khan Aamir Khan Controversy: एकेकाळी ‘मेला’ चित्रपटात एकत्र दिसलेले आणि ज्यांच्या मैत्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती, ते अभिनेते फैसल खान आणि आमिर खान (Amir Khan) यांच्यातील संबंध आता पूर्णपणे संपुष्टात आले आहेत. फैसल खानने (Faissal Khan) केवळ आपला भाऊ आमिर खानसोबतच नाही, तर संपूर्ण कुटुंबासोबतचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फैसलने कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
काही वर्षांपूर्वीच्या घटनांवरून फैसल आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले होते. अलीकडेच, जेव्हा फैसल खानने एका मुलाखतीत त्याच्यासोबत अनेक वर्षांपासून चुकीचे वर्तन होत असल्याचा दावा केला, तेव्हा आमिर आणि त्याच्या कुटुंबीयांनी हे विधान दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले.
यावर फैसल खानने ‘बॉलिवूड बबल’ ला दिलेल्या मुलाखतीत कुटुंबीयांशी सर्व संबंध संपवल्याचे जाहीर केले. त्यांनी स्पष्ट केले की, ते आता आमिरकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाहीत. आपल्या अधिकृत निवेदनात फैसल खानने म्हटले आहे की, ‘त्यांना आता त्यांचे दिवंगत वडील ताहिर हुसैन किंवा आई झीनत ताहिर हुसैन यांच्या कुटुंबाचा भाग मानू नये. त्यांना आई-वडिलांच्या संपत्तीत कोणताही हक्क नको आहे.’
फैसल खानने आमिरच्या घरी राहण्यास आणि आर्थिक मदत घेण्यास नकार दिला. त्यांनी आपल्या या निर्णयाचे कारण २००५ ते २००७ दरम्यान घडलेल्या घटना असल्याचे सांगितले. ‘२००५ ते २००६ दरम्यान मला जबरदस्तीने औषधे दिली गेली आणि माझ्या इच्छेविरुद्ध मला घरात कोंडून ठेवले. काही कुटुंबीयांनी त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी हे केले,’ असे फैसल म्हणाला.
तो पुढे म्हणाला, ‘२००७ मध्ये जेव्हा कुटुंबातील काही सदस्यांनी स्वाक्षरी करण्याचा अधिकार सोडून देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला, तेव्हा मी घर सोडले. माझ्या आई झीनत आणि मोठी बहीण निखत हेगडे यांनी माझ्याविरोधात चुकीचे विधान केले की, मला पॅरानॉइड सिझोफ्रेनिया आहे आणि मी समाजासाठी धोकादायक आहे. मात्र, २००८ मध्ये कोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला आणि कुटुंबाचे आरोप चुकीचे ठरवले.’
फैसल खानने कुटुंबावर त्यांना बदनाम करण्याचा आरोपही केला. तो म्हणाला, ‘माझे कुटुंब पुन्हा एकदा माझ्याविरोधात कट रचत आहे. त्यांनी चुकीचे विधान केले आहे की, मी दिशाभूल करत आहे आणि तथ्य चुकीच्या पद्धतीने सादर करत आहे.’ त्यांनी लोकांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आणि पुढील महिन्यात कोर्टात जाऊन कुटुंबाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.