बिहारमध्ये महाआघाडीचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला;
सहानींना १८ ते २० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागांवर निवडणूक लढवली होती; मात्र यावेळी पक्षाला फक्त ५० ते ५५ जागा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आरजेडी १२५ ते १३० जागा राखण्याच्या तयारीत असून, डाव्या पक्षांना ३० ते ३५ आणि व्हीआयपीला १८ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. आरएलजेपीला ३ ते ४, तर झामुमोला २ ते ३ जागा मिळू शकतात. व्हीआयपीला अपेक्षित १८ ते २० जागा मिळाल्यास, पक्ष मजबूत स्थितीत राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सूत्रांनुसार, काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाचा एक नवीन फॉर्म्युला तयार केला आहे.
या फॉर्म्युल्यानुसार —
अ श्रेणी : काँग्रेसकडे सध्या असलेल्या १९ जागांचा समावेश.
ब श्रेणी : मागील निवडणुकीत ५,००० ते १०,००० मतांनी पराभूत झालेल्या जागा.
क श्रेणी : १०,००० ते १५,००० मतांनी पराभूत झालेल्या जागा.
ड श्रेणी : १५,००० ते २०,००० मतांनी पराभूत झालेल्या जागा.
या गणनेनुसार काँग्रेस सुमारे ७० ते ७५ जागांवर दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार राजद काँग्रेसला ४८ पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याचे समजते. तरीही काँग्रेसला सुमारे ५५ जागा मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजदमध्ये २-३ जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे. यावेळी राजदच्या अनेक आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी म्हणाले की, महाआघाडीतील जागावाटप अंतिम झाले आहे. जर महाआघाडीने सरकार स्थापन केले तर ते उपमुख्यमंत्री असतील, असा दावा साहनींकडून सातत्याने केला जात आहे. हा काँग्रेससाठी देखील एक धक्का आहे. दुसरा संभाव्य पर्याय म्हणजे काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री नियुक्त करणे. महाआघाडीतील जागावाटपाची व्यवस्था अंतिम केली जाईल आणि एक-दोन दिवसांत त्याची घोषणा केली जाईल असे मानले जाते.






