Photo Credit : Social Media
हरियाणा: भारताची कुस्तीपटू विनेश फोगटचं ऑलिम्पिक सुवर्णपदकाचं स्वप्न अधुरंच राहिलं. अवघ्या अवघ्या 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून तिला थेट अपात्र ठरवण्यात आलं. यामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त केली जाता आहे. या धक्क्यानंतर विनेशने कुस्तीतून संन्यास घेतला. पण तरीही देशविदेशातून तिच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. तिच्या मेहनतीचे कौतुक केले जात आहे. तर काहीजणांकडून तिच्यावर टीकाही केली जातआहे.
अशातच एका भाजपच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर तिच्याविरोधात पोस्ट करून नव्या वादाची ठिणगी टाकली आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या पोस्टवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय हरियाणातील संपूर्ण जाट समाजानेही या पोस्टविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विनेशबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याचे नाव विशाल वार्षणेय आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर विशालने त्याच्या नावापुढे ‘भाजप’ असं लिहिलं आहे. त्यामुळे ही व्यक्ती भाजपचा नेता किंवा कार्यकर्ता असल्याचे मानले जात आहे.
विनेश अपात्र ठरल्यानंतर त्याने सोशल मीडियावर तिच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहीला आहे. ‘लैंगिक शोषणाचा आरोप तर केलाच होता. दोन-चार कपडे काढून टाकले असते तर 200 ग्रॅम वजन कमी भरलं असतं.’ अशी पोस्ट करत विशाल वार्षणेय याने केली आहे. त्याच्या या पोस्टवरून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर हरियाणातील जाट समाजाने या पोस्टवरून विशालविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केली.
दरम्यान, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध लोकगायिका नेहा सिंह राठोडनेही भाजप नेता विशाल वार्षणेयला सुनावलं आहे. “आक थू!” इतकेच लिहीत नेहाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतकेच नव्हे तर विनेशबद्दल अशी पोस्ट लिहून केवळ तिचाच नाही तर देशाचाही अपमान केल्याच्या प्रतिक्रिया संबंध सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.