BJP MLA opposes Owaisi taking oath
BJP MLA opposes Owaisi taking oath

  Akbaruddin Owaisi Appointed Telangana Protem Speaker : अकबरूद्दीन ओवेसी यांना तेलंगणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनविण्यात आले आहे. इतर आमदारांना शपथ देण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
  ओवेसी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती
  तेलंगणामध्ये काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता विधानसभेत आमदारांना शपथ देण्याचा सोहळा पार पडत आहे. यासाठी ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (AIMIM) पक्षाचे नेते अकबरूद्दीन ओवेसी यांना हंगामी अध्यक्ष (Pro-Tem speaker) बनविण्यात आले आहे. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांच्या वतीने ओवेसी यांची शनिवारी नियुक्ती केली गेली.

  आमदारपदाची शपथ घेणार नसल्याचे
  आता ओवेसी आमदारांना शपथ देण्याची जबाबदार पार पाडणार आहेत. मात्र भाजपाने यावर आक्षेप नोंदविला आहे. गोशामहलचे भाजपाचे आमदार टी. राजा सिंह यांनी आमदारपदाची शपथ घेणार नसल्याचे सांगितले आहे. शपथविधीवर त्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.
  हंगामी अध्यक्ष म्हणजे काय?
  संविधानाच्या अनुच्छेद १८८ नुसार निवडून आलेल्या सदस्यांना हंगामी अध्यक्ष शपथ देतात. हंगामी अध्यक्ष हा सभागृहाचा अस्थायी अधिकारी असतो. नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणे आणि अधिकृत अध्यक्षाची निवड होईपर्यंत विधानसभेचे कामकाज पाहणे, एवढेच हंगामी अध्यक्षाचे काम आहे. ज्यावेळी अधिकृत अध्यक्ष निवडला जातो, तेव्हा हंगामी अध्यक्षाचे पद आपोआपच समाप्त होते. आज सकाळपासून अकबरूद्दीन ओवेसी आमदारांना शपथ देत आहेत.
  भाजपा आमदारांकडून विरोध
  भाजपा आमदार आणि कट्टर हिंदुत्वावादी टी. राजा सिंह यांनी ओवेसी यांच्या नियुक्तीवर जोरदार आक्षेप घेत शपथ घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. राजा सिंह म्हणाले, “रेवंत रेड्डीदेखील आधीचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याप्रमाणे एमआयएम पक्षाला घाबरत आहेत, त्यामुळेच त्यांनी ओवेसींना हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले. नव्या सरकारचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचाही खरा चेहरा समोर आला. हे खूप दुर्दैवी आहे की. रेवंत रेड्डी म्हणत होते की, एमआयएम, भाजपा आणि बीआरएस एकत्र आहेत. आज कोण कोणासोबत आहे, हे जाहीर झाले.”
  १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना मारण्याची भाषा
  टी. राजा सिंह पुढे म्हणाले, अकबरुद्दीन ओवेसी यांनी १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना मारण्याची भाषा वापरली होती. अशा नेत्याकडून मी शपथ घेणार नाही. आम्ही या शपथविधीवर बहिष्कार टाकत आहोत. पुढच्या काळात पूर्णवेळ अध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाऊन शपथ घेऊ.”
  ओवेसी हे सहाव्यांदा आमदार
  एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजशिष्टाचारानुसार सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याला हंगामी सदस्याचा मान दिला जातो. २०१९ साली महाराष्ट्रात निवडणूक झाल्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार असताना दिलीप वळसे पाटील यांचीही एकदा हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती.