14240 किमी दूरून आली प्रेमासाठी; कुटुंबाच्या विरोधात मंदिरात लग्न, नैनितालमधील प्रेमकथेने साऱ्यांनाच केलं थक्क ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Canadian girl India love story : प्रेमात देशाची सीमा नसते, हे सिद्ध करणारी एक विलक्षण आणि थक्क करणारी प्रेमकथा उत्तराखंडमधून समोर आली आहे. कॅनडामधून तब्बल १४२४० किलोमीटरचा प्रवास करत एक मुलगी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी भारतात आली. त्यानंतर कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता तिने मंदिरात लग्न केलं आणि आपले प्रेम अधिकृत केलं.
ही प्रेमकथा आहे उत्तराखंडमधील रामनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाची आणि कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या एका तरुणीची. दोघांची ओळख सोशल मीडियावर, विशेषतः इंस्टाग्रामवर झाली होती. ही ओळख हळूहळू दृढ झाली आणि ती प्रेमात बदलली. तीन वर्षांच्या या संवादानंतर, त्यांनी एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.
११ जुलै रोजी ती मुलगी आपल्या कुटुंबाच्या परवानगीने भारतात पोहोचली. सुरुवातीला ती हैदराबादमध्ये आपल्या मामाकडे राहायला गेली, जिथे तिचे मूळ कुटुंब राहत होते. मात्र, रात्रीच्या वेळेस ती मामाच्या घरातून अचानक निघून गेली. यामुळे घरात खळबळ उडाली. कुटुंबीयांनी हैदराबाद पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ताच्या तक्रारीची नोंद केली. यावेळी मुलीचे पालकही कॅनडाहून भारतात पोहोचले. हैदराबाद पोलिसांनी त्वरेने तपास सुरू केला आणि तिच्या मोबाईलच्या लोकेशनद्वारे रामनगर (नैनीताल जिल्हा) येथे तिचा शोध लागला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
रामनगर पोलिसांच्या मदतीने मुलगी आणि मुलगा दोघांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्याठिकाणी कुटुंबीयांनी मुलीला विनंती केली की ती त्यांच्या सोबत घरी परत यावी. मात्र, मुलीने ठामपणे सांगितले की ती फक्त आपल्या प्रियकरासोबतच आयुष्य घालवू इच्छिते. पोलिसांनी समजुतीने संभाषण केलं, पण तिचा निर्णय ठाम होता. शेवटी, तिच्या कुटुंबीयांनीही तिच्या निर्णयाचा आदर करत परतीचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर दोघांनी स्थानिक मंदिरात विवाह केला आणि आपल्या प्रेमसंबंधाला अधिकृत मान्यता दिली.
या कथेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकमेकांशी फक्त डिजिटल माध्यमातून संवाद करणाऱ्या या दोघांनी प्रेमावर पूर्ण विश्वास ठेवून आपल्या नात्याला खऱ्या आयुष्यात आकार दिला. मुलगी कॅनडामधून भारतात येऊन विवाह करण्याचा निर्णय घेते, हे पाहून अनेकांनी या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Ring of Fire’ मधून बाहेर आला राक्षस! 1600 किमी धुराची नदी, NASAलाही बसला धक्का
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, प्रेमाला ना जात, ना धर्म, ना देश यांची बंधनं असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली मैत्री, विश्वास आणि प्रेमाच्या प्रवासात बदलली आणि त्यातून एक नवा संसार उभा राहिला. अनेक अडथळ्यांचा सामना करत, कुटुंबाच्या विरोधालाही सामोरे जात या तरुणींनी आपल्या मनाचा निर्णय घेतला, हे निश्चितच प्रेरणादायी आहे.