नेदरलँड : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक कोंबडा नेदरलँड मध्ये व्यक्तीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला. ऐकायला काहीसं विचित्र वाटेल, पण ते खरं आहे. नेदरलँडमधली एक व्यक्ती कोंबड्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. कॅन्सरवर मात केलेल्या जॅस्परचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जॅस्पर क्रॉस नावाच्या व्यक्तीने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केली; पण एका कोंबड्याचा हल्ला तो सहन करू शकला नाही. त्यांच्या घरातल्या एका कोंबड्याने त्यांना इतक्या जोरात पंजा मारला की रक्तबंबाळ होऊन त्यांचा मृत्यू झाला. `द हेग`मध्ये राहणारे जॅस्पर आयर्लंडमध्ये त्यांच्या घरी होते. त्या वेळी एका कोंबड्याने हल्ला करून त्यांना जखमी केलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
कोंबड्याने माणसाला संपवलं
जॅस्परच्या घरात वाढलेल्या ब्राम्हा कोंबड्याने यापूर्वी त्यांच्या नातीवरही हल्ला केला होता; पण ती त्यातून वाचली होती. याबाबत जॅस्पर यांच्या मुलीने सांगितलं, की `सकाळी मी माझ्या वडिलांना काही वस्तू देण्यासाठी गेले होते. त्या वेळी ते झोपले होते. काही वेळाने मला शेजाऱ्यांनी जॅस्पर यांची प्रकृती बिघडल्याचं फोन करून सांगितलं. त्यांच्यावर पाळीव कोंबड्याने हल्ला केला आणि त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली होती. या जखमेतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. जॅस्पर यांची हाक शेजाऱ्यांना ऐकू आली. शेजारी त्यांच्याकडे गेले तेव्हा जॅस्पर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि तोपर्यंत त्यांना सीपीआर देण्यात आला.`
प्रकृती कशी बिघडली?
वास्तविक जॅस्पर काही काळापूर्वीच कॅन्सरमधून बाहेर आले होते आणि त्यांची औषधं अद्याप सुरू होती. अशा स्थितीत कोंबड्याने अचानक हल्ला केल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा आणि ते या परिस्थितीतून वाचू शकले नाहीत. रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. बेशुद्ध पडताना त्यांनी आपल्यावर कोंबड्याने हल्ला केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्ला कोंबड्याने केला हे कळायला वेळ लागला नाही. त्यांच्या मृत्यूची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कॅन्सरवर मात केलेल्या जॅस्पर यांचा मृत्यू अशा प्रकारे झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.