देशामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजारांच्या पुढे गेली आहे (फोटो - iStock)
नवी दिल्ली : कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. चार वर्षापूर्वी जगभरात थैमान घालणारा कोरोना व्हायरस आता पुन्हा एकदा धास्ती निर्माण करत आहे. देशामध्ये कोविड -19 चे रुग्ण आढळत असून यामुळे चिंता वाढली आहे. मागील चार दिवसांमध्ये देशभरामध्ये तब्बल 31 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने देशातील आणि विविध राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी समोर आणली आहे.
देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता चार हजारपेक्षा जास्त आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनच्या एक्टिव्ह पेशंटची संख्या 4026 वर पोहोचली आहे. यापैकी 50 टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 1416 सक्रिय रुग्ण आहेत, तर महाराष्ट्रातील 494 रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशभरात 2700 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 31 मृत्यू हे गेल्या चार दिवसांत झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक दहा मृत्यूंची नोंद झाली आहे. सोमवारी 70 वर्षीय पुरुष आणि 73 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये प्रत्येक राज्यात एक मृत्यू झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्राची स्थिती काय?
महाराष्ट्रात कोविड-19 चे 59 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 20 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. यासह, या वर्षी 1 जानेवारीपासून राज्यात बाधितांची संख्या 873 झाली आहे. आरोग्य विभागाच्या निवेदनानुसार, जानेवारी 2025 पासून राज्यात एकूण 12 हजार लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि सक्रिय प्रकरणे 494 आहेत तर 369 रुग्ण बरे झाले आहेत. नवीन रुग्णांपैकी 20 रुग्ण हे मुंबईतील, 17 रुग्ण पुणे महानगरपालिका हद्दीतील, चार ठाणे येथील आणि एक रुग्ण पुणे जिल्ह्यातील (महानगरपालिका क्षेत्राबाहेरील) आहे. राज्यातील कोविड-१९ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळत असून विभागाकडून चाचणी आणि उपचार सुविधा पुरविल्या जात आहेत. विभागाने सांगितले की, १ जानेवारीपासून मुंबईत ४८३ कोविड-१९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि त्यापैकी बहुतेक, ४७७, केवळ मे महिन्यातच नोंदवली गेली आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दिल्लीतील रुग्णलयामध्ये तयारी सुरु
देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे, दिल्लीतील आरएमएल, सफदरजंग आणि इतर रुग्णालयांनी तयारी सुरू केली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ ही चिंतेची बाब नाही. कोणत्याही रुग्णाला गंभीर समस्या नाहीत. सर्वांमध्ये सामान्य लक्षणे आहेत. आरएमएल रुग्णालयात 09 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, कोविड साथीची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही पण ती अजूनही सक्रिय आहे. न्यायालयाने केंद्र सरकारकडून नमुना संकलन, केंद्र आणि वाहतूक धोरणाबाबत केलेल्या तयारीची माहिती मागितली आहे. यावर केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, आरोग्य विभाग आणि आयुष मंत्रालय पूर्णपणे सतर्क आहे. आम्ही सर्व राज्यांमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही संबंधित सचिव आणि मंत्र्यांशी बोललो आहोत. ते पुढे म्हणाले की, मागील कोविड लाटेदरम्यान तयार केलेले ऑक्सिजन प्लांट, आयसीयू बेड यासारख्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू आहे, अशी स्पष्ट भूमिका प्रतापराव जाधव यांनी घेतली आहे.