Pune News : पावसाळ्यापूर्वीच केली जाणार रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे; अतिरिक्त आयुक्तांनी दिले 'हे' महत्त्वपूर्ण आदेश (फोटो सौजन्य- प्रतिनिधी)
पुणे : यंदा तरी पावसाळ्यात पुणेकरांची रस्त्यांवरील खड्डयातून सुटका होणार का? असा प्रश्न अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने पडला आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व रस्त्यांची दुरुस्तीची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश पथ विभागाला दिले आहेत.
महापालिकेच्या विविध विभागांना सेवा वाहिन्या टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मलनि:सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदिश खानोरे, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व संबंधित विभागांच्या पथ विभागाकडून दिलेल्या रस्ते खोदाई परवानगीच्या सर्व ठिकाणच्या तसेच प्रमुख रस्त्यावरील ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. काही अपवाद वगळता बहुतांश विभागांचे काम झालेले असून, रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. या सर्व खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी जास्त मनुष्यबळ वापरून हे काम 7 जूनपर्यंत पूर्ण करा, असे आदेश दिवटे यांनी दिले आहेत.
दरम्यान, दुरुस्तीची कामे करताना कामे गुणवत्तापूर्वक करण्याबाबत संबंधित कनिष्ठ अभियंत्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे व त्यांच्या उपस्थितीत ही कामे करून घ्यावी. दुरुस्तीच्या कामांची बिले पावसाळा पूर्ण होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये. आपत्ती निवारण संदर्भातील करावयाची खोदाई आणि कामाच्या संदर्भात पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवण्यात येऊन काम करावे, अशा सूचना दिवटे यांनी दिल्या आहेत.
काही भागातील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात
मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पुण्याला अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. यामुळे काही भागातील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. सध्या पावसाने उघडीप दिली असून, रस्ते दुरुस्तीचे काम अद्याप वेगाने होत नसल्याचे दिसत आहेत. महापालिकेच्या विविध विभागाने केलेल्या खोदाईच्या ठिकाणी अद्याप रस्ते दुरुस्तीचे काम सुरु झाले नाही.