मेघालयमध्ये (Meghalaya) सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. इथे 27 फेब्रुवारीला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच 2 मार्चला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे (BJP) मेघालय प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांच्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. मेघालयचे भाजपा प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी (Ernest Mawrie) यांनी गोमांसाबद्दल एक वक्तव्य केलं आहे. मावरी म्हणाले की, मी गोमांस खातो आणि माझ्या पक्षाला माझ्या गोमांस खाण्यावर कोणताही आक्षेप नाही. माध्यमांशी संवाद साधताना मावरी यांनी असा दावा केला आहे. मावरी म्हणाले की, “मेघालयमध्ये सर्वजण गोमांस खातात. गोमांसावर मेघालय राज्यात कोणत्याही प्रकारची बंदी नाही. गोमांस खाणं ही आमची संस्कृती आणि सवयही आहे.” यावेळी मावरी यांनी गोहत्येबाबत भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर भाष्य केलं.
[read_also content=”“ती प्रॉपर्टी नव्हे तर, शिवसेना भवन आमच्यासाठी…”, विधिमंडळ कार्यालय घेतल्यानंतर शिंदे गट शिवसेना भवनाकडे कूच करणार? शिरसाट म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/not-that-property-shivsena-bhavan-for-us-will-the-shinde-group-march-towards-shivsena-bhavan-after-taking-the-legislative-office-shirsat-said-370907.html”]
मावरी यांना विचारण्यात आलं की, हिंदू धर्मात तर गाय खूप पवित्र मानली जाते ना ? या प्रश्नाचे उत्तर देताना मावरी म्हणाले की, “आम्ही आमच्या जेवणाच्या सवयी नेहमी फॉलो करतो. राज्यात अशी कोणत्याही प्रकारची बंदी नाही. गोमांस खाण्याबाबत आमच्याकडे कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. कोणीही तसे निर्देश दिलेले नाही. भाजपा कोणत्याही जात, पंथ, धर्माच्या अनुषंगाने विचार करत नाही. आम्हाला जे हवे ते आम्ही खाऊ शकतो, आमच्या खाण्याच्या सवयी आम्ही फॉलो करतो. यावर एखाद्या राजकीय पक्षाला अडचण असण्याचे कारण काय?”
मेघालयमधील विधासभा निवडणुकीआधी भाजपा प्रदेशाध्यक्षांनी पक्षाच्या विजयाचा दावा केला आहे. किमान 34 जागांवर भाजपला यश मिळेल. मावरी म्हणाले की, राज्यातल्या सर्व 60 मतदार संघात आमचा पक्ष लढणार आहे आणि सगळीकडे उमेदवार जाहीर करण्यात येईल. मावरी म्हणाले की, पार्टी हाय कमांडला राज्यात भाजपाकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. आगामी निवडणुकीत मेघालयमध्ये भाजपा, एनसीपी आणि यूडीपीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. मावरी पुढे म्हणाले की लोकांना राज्यामध्ये शांती आणि विकास हवा असेल तर भाजपला संधी द्यायला हवी.






