तामिळनाडूत फेंगलचे थैमान (फोटो- istockphoto)
तामिळनाडू: फेंगल चक्रीवादळाचा तामिळनाडूला मोठा फटका बसल्याचा पाहायला मिळत आहे. फेंगल चक्रीवादळाचा मोठा फटका राज्यात बसला आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते, आणि अन्य गोष्टींचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
मुसळधार पाऊस होत असल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तु मिळणे अवघड झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशी चक्रीवादळसंदर्भात चर्चा केली आहे. तसेच परिस्थिती जाणून घेतली आहे. केंद्र सरकारतर्फे सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना दिले आहे.
फेंगल चक्रीवादळामुळे 12 जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्या चक्रीवादळचा परिणाम महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर देखील जाणवला आहे. काही ठिकाणी हलक्या सरी देखील कोसळल्या आहेत. या पूरस्थिति आणि मुसळधार पावसाने आतापर्यंत 12 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आढावा बैठक घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश अधिकाऱ्याना दिले आहेत.
हेही वाचा: Cyclone Fengal: बंगळुरुमध्ये अतिवृष्टीचा इशारा; शाळा – महाविद्यालयांना सुट्टी नाही? पालकांचा संताप
IMD ने बेंगळुरू आणि आसपासच्या परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडून नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. अतिवृष्टीचा इशारा असूनही, बंगळुरूमधील शाळा आणि महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर संबंधित पालक आणि रहिवाशांकडून आक्रोश निर्माण झाला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
केंद्रशासित प्रदेश आणि तामिळनाडूमधील इतर ठिकाणांवर फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून लष्कराने पूरग्रस्त रस्त्यावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. फेंगल चक्रीवादळाचा जोर आता काहीसा कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याचा परिणाम अजूनही लोकांवर होत आहे.
हेही वाचा: ‘फेंगल’ चक्रीवादळाचा अंदमान समुद्रात मोठा विध्वंस; भारतात ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा
चेन्नईतील शाळांना सुट्टी जाहीर
पुडुचेरी सरकारने आज सोमवारी केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. कुड्डालोर आणि विल्लुपुरम जिल्ह्यातही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे तामिळनाडू सरकारने एकट्या वेल्लोर आणि राणीपेट येथील शाळांना सुट्टी जाहीर केली होती. फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नई आणि तिरुपतीमधील खराब हवामानामुळे शनिवारी दुस-या दिवशी हैदराबादला जाणारी आणि तेथून येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली होती. याबाबत विमानतळ प्रशासनाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली होती. चेन्नई विमानतळाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते की, फेंगल चक्रीवादळाचा परिणाम उड्डाणांवर देखील झाला.