'पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे ही क्रूरताच'; केरळ उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण (संग्रहित फोटो)
तिरूवनंतपुरम : पती-पत्नीमधील वाद हा नवीन विषय नाही. मात्र, जर हा वाद टोकाला गेला की कोर्टापर्यंत जावं लागणे हे अनेकदा घडतं. त्यातच आता केरळ उच्च न्यायालयाने घटस्फोटाच्या एका प्रकरणावर निर्णय देताना पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे ही क्रूरता असल्याची टिप्पणी केली आहे. न्यायालयाने या निरीक्षणासह महिलेला घटस्फोट मंजूर केला.
महिलेचा पती तिच्यावर संशय घेत होता आणि तिच्या काही गोष्टींकडे लक्ष ठेवत होता. त्याने तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि एम.बी. स्नेहलता यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “पती किंवा पत्नीवर संशय घेतल्याने नातेसंबंधाचा पाया ढासळतो. जिथे पती किंवा पत्नी संशय, विश्वास, आदर आणि भावनिक सुरक्षिततेच्या आधारे एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात तिथे ते टिकू शकत नाही. या प्रकरणात पतीचे वर्तन घटस्फोट कायदा, १८६९ च्या कलम १०(१)(x) अंतर्गत गंभीर मानसिक क्रूरतेसारखे आहे. घटस्फोट मंजूर करण्यासाठी हे पुरेसे आहे”.
हेदेखील वाचा : Supreme Court News: निर्दोषांना त्रास देण्यासाठी हा कायदा नाही; धर्मांतर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
खंडपीठाने म्हटले आहे की, “एक संशयास्पद पती, जो आपल्या पत्नीच्या निष्ठेवर शंका घेतो, तो तिचा स्वाभिमान आणि मानसिक शांती नष्ट करतो. परस्पर विश्वास हा विवाहाचा आत्मा आहे; जेव्हा त्याची जागा संशयाने घेतली जाते तेव्हा नातेसंबंध सर्व अर्थ गमावतो.”
…त्यामुळे पत्नीला होतो मानसिक त्रास
खंडपीठाने म्हटले आहे की, “जेथे पती आपल्या पत्नीवर संशय घेतो, तिच्या हालचालींवर लक्ष ठेवतो. तिच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आणि तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करतो, त्यामुळे पत्नीला मानसिक नुकसान होते”.






