टिम सेफर्टने 25 चेंडूत ठोकले अर्धशतक(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ 4th T20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना आज विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस गमावणारा न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत आहे. न्यूझीलंडच्या टिम सेफर्टने २५ चेंडूत ५० धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले.
पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथ्या समान्यापूर्वी भारताने नानेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा हा निर्णय किवीच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात टिम सेफर्ट आणि डेव्हॉन कॉनवे या सलामीवीरांनी केली. या दोघांनी ८ षटकातच १०० धावा जोडल्या. या दरम्यान, पॉवरप्लेमध्ये या जोडीने भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल चढवला. पॉवरप्लेमध्ये यांनी ६ ओव्हरमध्येच ७१ धावा केल्या. टिम सेफर्ट अधिक आक्रमक दिसून आला. त्याने फक्त २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. तो आता भारताविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा पहिलाच किवी फलंदाज ठरला आहे.
टिम सेफर्ट आणि डेव्हॉन कॉनवे यांनी ८.२ षटकात १०० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर डेव्हॉन कॉनवे २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाररांच्या मदतीने ४४ धावांची खेळी करून बाद झाला. त्याला कुलदीप यादवने माघारी पाठवले. त्यानंतर मैदानात आलेला रचीन रवींद्र काही खास करू शकला नाही. त्याला २ धावांवरच जसप्रित बूमराहने बाद केले. आता मैदानावर टिम सेफर्ट ६० धावांवर तर ग्लेन फिलिप्स ६ धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडच्या ११ षटकात २ गडी गमावून ११६ धावा झाल्या आहेत. भारताकडून बूमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टिम सेफर्ट (डब्ल्यू), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सॅन्टनर (क), झकरी फॉल्केस, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी
भारत प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (डब्ल्यू), सूर्यकुमार यादव (क), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह






