File Photo : Accident
प्रयागराजमधील महाकुंभात स्नान करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १० भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नंदगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुसुम्ही महामार्गावर ही भीषण दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
महाकुंभाहून पिकअप व्हॅनने भाविक गाजीपूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी वाराणसी-गोरखपूर महामार्गावर पिकअपवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी जोराची होती की ट्रकला धडकल्यानंतर पिकअपमधील लोक रस्त्यावर पडले. याच दुर्घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
भीषण अपघातानंतर स्थानिकांनी सूचना पोलिसांना दिली. अपघाताची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरील मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. या अपघातामधील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये २ महिला, २ पुरुष आणि २ लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचत माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी जखमींची विचारपूस केली.
रस्ता अपघातात जखमी झालेल्या जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर उपचार करण्यात येत आहे. एसपी डॉ. ईरज राजा यांनी सांगितलं की, ‘भीषण अपघातात ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाजीपूरमधील रस्ता अपघाताची दखल घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली. मुख्यमंत्री योगी यांनी जखमींवर रुग्णालयात तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले. तसेच यावेळी योगी आदित्यनाथ यांनी जखमी लोक लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना केली.