ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल अडचणीत; हरियाणा सरकार खटला दाखल करणार, मोठं कारण आलं समोर
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना यमुनेच्या पाण्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल ऐन निवडणुकीत अडचणीत आले आहेत. प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. हरियाणा सरकारने केजरीवालांविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हरियाणाचे मंत्री विपुल गोयल यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत, “केजरीवाल यांच्या विधानामुळे दिल्ली आणि हरियाणात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला असून त्याची प्रक्रियाही सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं.
यापूर्वी, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेकडून माफी मागावी किंवा मानहानीच्या खटल्याला सामोरं जावं, असं म्हटलं आहे. “निवडणुकीत केजरीवाल यांना पराभव दिसत आहे, त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं आहे. त्यांनी दिल्ली आणि हरियाणाच्या जनतेची ताबडतोब माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करू. ज्या भूमीवर त्यांचा जन्म झाला त्या भूमीचा अपमान केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता, त्याबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावून पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी कोणतेही ठोस पुरावे आणि उत्तर दिलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. अरविंद केजरीवाल यांना बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे, त्यामुळे ऐन निवडणुकीत केजरीवालांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सोमवारी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की हरियाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. तथापि, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे.
केजरीवाल यांच्या या विधानानंतर दिल्लीत यमुनेच्या पाण्याबाबत राजकीय वाकयुद्ध सुरूच आहे. भाजपने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला. दरम्यान, हरियाणाच्या नायब सैनी सरकारने हे आरोप फेटाळून लावले आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. तसेच, हरियाणा सरकार केजरीवाल यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे.