नवी दिल्ली – एका 35 वर्षीय व्यक्तीचा गरबा डान्स करताना अचानक मृत्यू झाला. 20 वर्षीय नवरीचाही वराला वरमाळ घालताना अचानक कोसळून मृत्यू झाला. एवढेच नाही तर मित्रांच्या गळ्यात हात टाकून फिरणाऱ्या एका तरुणाचाही असाच अचानक मृत्यू झाला. या सर्वांचा मृत्यू हृदयविकाराचा धक्का किवा कार्डियक अरेस्टने झाला.
अशा प्रकारचे विविध व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहून देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनांमागे कोरोना व्हायरसमुळे तर होत नाही ना? असा प्रश्न सर्वांना पडला. आता अचानक होणाऱ्या या मृत्यूंवर हृदयविकार तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे.
एम्समधील कार्डियोलॉजीचे प्रोफेसर डॉक्टर राकेश यादव म्हणाले, ‘अचानक कार्डियक मृत्यू झालेल्या घटनांचा सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही. पण पुढे येणाऱ्या घटनांना पाहून त्याचा संबंध कोरोना महामारीशी असू शकतो असे वाटते.’
यादव व त्यांचे सहकाऱ्यांचा 2020 मध्ये इंडियन हार्ट जर्नलमध्ये (आयएचजे) एक लेख प्रकाशित झाला होता. त्यात त्यांनी कोरोनामुळे कोणत्याही सदृढ दिसणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असे नमूद केले होते. यात अनियमित हृदयगती व कमजोर हृदय मसल्सचा समावेश होता.
एम्सच्या प्रोफेसरनी सांगितले की, कालानुरुप संसर्गाचा इतिहास व हृदयाशी संबंधित आजारांच्या वाढत्या जोखमीचा संबंध दाखवणारे काही पुरावे उजेडात आलेत. ते म्हणाले, “माझी थेट सूचना आहे की, लोकांनी आपले वय व फिटनेसची काळजी न करता हृदयासंबंधी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्य संकटाची जोखीम कमी करण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचा सल्लाही दिला जातो.”