राजधानी दिल्लीत पावसाचा हाहा:कार; महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, यमुना नदीचे पाणी...(File Photo : Delhi Rain)
नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच, दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. दिल्लीच्या अनेक भागांत पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर दुसरीकडे, यमुना नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे आता अनेक सखल भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.
दिल्लीच्या यमुना बाजार, मजनू का टीला, मयूर विहार, गीता कॉलनी आणि झरोडा कलान यांसारख्या भागात घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. हवामान खात्याने या महिन्यातही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. खराब हवामान आणि पावसामुळे विमानसेवेवर परिणाम झाला आहे. काही विमाने उशिराने उड्डाण करत आहेत. तर काही विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
दरम्यान, यमुना नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबाबत डीएमआरसीने अलर्ट दिला आहे. यमुना नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे, यमुना बँक मेट्रो स्टेशनकडे जाणारा जोडणारा रस्ता सध्या दुर्गम आहे. स्टेशन कार्यरत असून, इंटरचेंज सुविधा उपलब्ध आहे. याबाबतची माहिती डीएमआरसीने दिली आहे.
यमुना बाजार परिसरात खाजगी रुग्णालय करण्यात आले रिकामे
दिल्लीतील यमुना नदीकाठच्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच वेळी, यमुना बाजारात असलेले खाजगी रुग्णालय रिकामे करण्यात आले आहे. आता तिथे एकही रुग्ण नाही. यमुनेच्या पुरात नालाही बुडाला आहे. नाला पुराच्या पाण्याने भरला आहे. काश्मिरी गेटवरून निगम बोध घाटाकडे येणाऱ्या रस्त्यावर पुराचे पाणी पोहोचले आहे.
गुरुग्रामच्या अनेक भागात पाणी
गुरुग्रामच्या सदर बाजारातील अग्रसेन चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक थांबली आहे. त्याच वेळी, पाणी साचल्याने आणि रस्त्याच्या तुटण्यामुळे शीतला माता रोडवर मोठी कोंडी झाली आहे.
अनेक राज्यांत मुसळधार पाऊस
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतात सप्टेंबरची सुरुवात पावसाळी झाली. दोन दिवसांपासून राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील काही इतर राज्यांमध्येही परिस्थिती बिकट झाली आहे.