भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची हाय व्होल्टेज बैठक; संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही सैन्यप्रमुखांची उपस्थिती
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये दिस आहे. पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान उपस्थित होते.
Pahalgam Terror Attack: LOC वर घडामोडींना वेग; हवाई दलासह सैन्याला हायअलर्टचा आदेश
या बैठकीस थलसेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे देखील उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण बैठकीत पहलगाम हल्ल्यानंतरची सुरक्षास्थिती, दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमा आणि भविष्यातील धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली.
#WATCH | PM Narendra Modi chairs a meeting with Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, CDS and chiefs of all the Armed Forces. pic.twitter.com/Wf00S8YVQO
— ANI (@ANI) April 29, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या बैठकीत हल्ल्याची पार्श्वभूमी, सुरक्षा दलांची कृती आणि पुढील रणनीतीवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याचे दोषी कोण आहेत, यांच्याविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच अमरनाथ यात्रा आणि इतर नागरी उपक्रमांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर होऊ नये, याचीही त्यांनी खातरजमा केली आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. याला अलीकडच्या काळातील सर्वात घातक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानले जात आहे. या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचा शोध सुरू असून सुरक्षा दलांकडून विविध ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन्स सुरू आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर विविध प्रकारचे निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.