उत्तराखंडमध्ये 6000 पोलिस, PAC च्या १७ आणि पॅरा मिलिटरीच्या 10 कंपन्या तैनात; नक्की कारण कारण काय?
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, उत्तराखंडमध्ये लवकरच सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा १ मे म्हणजेच बुधवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रा मार्गांवर सुमारे 6000 पोलिस, 17 PAC (प्रोव्हिंशियल आर्म्ड कॉन्स्टेबलरी) कंपन्या आणि 10 अर्धसैनिक दलांच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक (DGP) दीपम सेठ यांनी दिली.
गुप्तचर यंत्रणा अलर्टवर
DGP सेठ यांनी सांगितले की, अपघाताची शक्यता असलेल्या 65 हून अधिक ठिकाणी SDRF चे (राज्य आपत्ती निवारण बल) जवान तैनात केले जातील. याशिवाय, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. गुप्तचर यंत्रणाही सतर्क ठेवण्यात येणार असून कोणत्याही संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
या वर्षीच्या चारधाम यात्रेत सुमारे 60 लाख भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी 48 लाख भाविक आले होते, मात्र त्या वेळी अतिवृष्टीमुळे केदारनाथ ट्रॅक रस्ता खराब झाला होता आणि यात्रा दोन आठवड्यांहून अधिक काळ बंद ठेवावी लागली होती.
चारधाम यात्रा उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांच्या दरवाजे उघडण्याने सुरू होईल. केदारनाथचे दरवाजे २ मे रोजी, तर बद्रीनाथचे दरवाजे ४ मे रोजी उघडण्यात येणार आहेत.
संपूर्ण यात्रा मार्ग १५ सुपर झोनमध्ये विभागण्यात आला आहे आणि २००० हून अधिक CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय, गढ़वाल रेंजमध्ये एक इंटीग्रेटेड कमांड सेंटर स्थापन करण्यात आले आहे. DGP सेठ यांनी ऋषिकेशमधील ट्रान्झिट कॅम्पमध्ये भाविकांशी भेट घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्यांना निर्भयपणे यात्रा करण्याचे आश्वासन दिले.
चारधाम यात्रा अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित बनवण्यासाठी, प्रशासनाने यंदा बद्रीनाथ धाममध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत. मंदिर परिसरात फोटो काढणे व व्हिडिओ कॉलिंगवर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित भाविकांकडून ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.