५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल: भारताचे जागतिक नेतृत्वाचे स्वप्न ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केवळ आर्थिक स्तरावर नाही तर सामाजिक स्तरावरही परिवर्तनातून २०४७ पर्यंत भारताला विकसित देशांच्या यादीत नेऊन बसवण्याची मनिषा आहे. सध्याचा काळ मात्र आव्हानात्मक काळ आहे. जागतिक अर्थव्यवस्था एका महत्त्वाच्या नाजूक टप्प्यावर उभी आहे. जागतिक पुरवठा साखळीत येत असलेले व्यत्यय, अनेक देशांची स्वसंरक्षणवादी धोरणे, वाढलेले भू-राजकीय तणाव आणि बदलत्या जागतिक व्यापार पद्धती यामुळे ही आव्हाने आणखीनच जटील आणि किचकट होत चालली आहेत. आपण यापूर्वी कधीही न पाहिलेल्या वेगाने जगाची आणि देशाची तांत्रिक प्रगती पाहात असताना जागतिक व्यापाराची पुनर्रचना केली जात आहे. व्यापाराची पुनर्परिभाषा केली जात आहे. या साऱ्यात एकच गोष्ट समान आहे, ती म्हणजे हवामान आणि शाश्वत विकास.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशिया-युक्रेन युद्धात 30 तासांची युद्धबंदी; 500 युद्धकैद्यांची झाली सुटका
अनेक देशांत अंतर्गत परिवर्तन होत असताना जागतिक गतिमानताही वाढत आहे. त्यात भारत जागतिक स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध करत आहे. एकीकडे, वाढली अर्थव्यवस्था, तरुण लोकसंख्या, वाढत्या पायाभूत सुविधा आणि तांत्रिक प्रगती ही आपली ताकद आहे; तर दुसरीकडे, जागतिक स्तरावर भारताचा भू राजकीय प्रभाव, धोरणात्मक भागीदारी, सॉफ्ट पॉवर यामुळे भारताचे जागतिक राजकीय संदर्भातील महत्त्व अधोरेखीत होते. दुसरीकडे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्ट-अप इकोसिस्टम तयार करणारा देश ठरला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि सोलर सारख्या क्षेत्रातील उत्पादन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजना उत्पादन पुनरुज्जीवनाला चालना देत आहेत. भारताची डिजिटल अर्थव्यवस्थाही झपाट्याने बदलत आहे. देशात ८० कोटीहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत. एआय, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन आणि इंडस्ट्री ४.० हे आता केवळ बझवर्ड राहिलेले नाहीत, त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्याने भारत डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
भारत आता विकसनशील देशांच्या यादीतून झपाट्याने विकसीत देशांच्या यादीत समाविष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स बनवण्याचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उराशी बाळगले आहे. हे स्वप्न म्हणजे केवळ दरडोई उत्पन्नाचे आकडे नाहीत तर ते लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढणे, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा सुरक्षा आणि डिजिटल सक्षमीकरणातून हे साध्य केले जाणार आहे. – डॉ. पी. के. मिश्रा
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हुकूमशाहीविरोधात मोठी चळवळ उभी राहताना; ट्रम्प सरकारविरोधात अमेरिकेत संतापाची लाट हजारो नागरिक रस्त्यावर
२०३० पर्यंत ५०० गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा क्षमता विकसीत करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन सौर आघाडी, ग्लोबल बायोफ्युएल चळवळीचा सह-संस्थापक म्हणून भारताने स्वच्छ तंत्रज्ञान, हरित वित्त, ईव्ही, कार्बन ट्रेडिंग या पद्धती स्वीकारल्या आहेत.
भारतीय औषधे साऱ्या जगासाठी जीवनरेखा आहेत. ‘मेड इन इंडिया’ वर वाढत्या विश्वासामुळे, जागतिक बाजारपेठांत आपल्या उत्पादनांचा दबदबा वाढतो आहे. दुसरीकडे भारताची आयटी निर्यात २०० अब्ज डॉलर्सहून जास्त झाली आहे. अशा स्थितीत देशातील मनुष्यबळाचा कौशल्याधारीत विकास महत्वाचा ठरतो. विकास, उत्पादकता आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी व्यवस्थापन कौशल्यावरील जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत. हे सारे करताना अर्थातच नैतिक, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासावर भर द्यावा लागेल. ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेनुसार, ‘जग हे एक कुटुंब आहे.’ जे नेते नफा आणि पदांच्या पलीकडे विचार करतात, तेच नेते खऱ्या अर्थाने जागतिक वर्चस्वाचे एप्न पाहतात. हे स्वप्न भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. आणि त्यादृष्टीने त्यांनी देशाला जागतिक नेतृत्त्वाच्या दिशेने नेण्यासाठी ठोस आणि शाश्वत पाऊले टाकली आहेत. (लेखक पंतप्रधानांचे प्रधान सचिव आहेत.)