आठवड्याचे इतके तास काम करा, एकही सुट्टी घेऊ नका ; नारायण मूर्तीं आपल्या विधानावर ठाम
इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या देशातील तरुणांनी ७० तास काम केलं पाहिजे, असं विधान केलं होतं. प्रचंड मानसिक तणावाच्या या वातावरणात अनेकांना नारायण मूर्ती यांचं विधान खटकलं होतं. त्यावरून ते ट्रोलही झाले होते. नारायण मूर्ती यांनी आता पुन्हा कामाचे तास आणि सुट्टीवरून प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी तरुणांना यासंदर्भात एक आवाहन देखील केलं आहे.
नारायण मूर्ती कोलकातामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांना भारतातील तरुणांबाबत विचारणा केली असता त्यांनी ७० तास काम करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. देशातील तरुणांनी कठोर मेहनत घेऊन आपल्या देशाला क्रमांक एकवर नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गरिबीसारख्या समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणखी वाढवायला हव्यात आणि त्या पूर्ण करण्यासाठी झटून काम करायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
भारतीयांनी आठवड्याला किती तास काम करायला हवे याविषयी नारायण मूर्तींनी गेल्या वर्षी? याबाबत भूमिका मांडली होती. त्यांच्या मते भारतीयांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवं. आठवड्याला ७० तास म्हणजे दिवसाला १० तास आणि एकही सुट्टी न घेता आपण काम केलं पाहिजे, अशी भूमिका नारायण मूर्तींनी मांडली. नारायण मूर्ती स्वत: इन्फोसिसच्या स्थापनेवेळी आठवड्याला ८५ ते ९० तास काम करायचे, असं त्यांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
“८० कोटी भारतीय आजही रेशनिंगच्या धान्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची मोठी गरज आहे. मग यासाठी जर आपण कठोर मेहनत करणार नसू, तर कोण करणार?” असा सवालही नारायण मूर्ती यांनी यावेळी उपस्थित केला.






