संग्रहित फोटो
या प्रकरणी हर्ष प्रविणचंद्र परमार (वय ४२, रा. गुलालवाडी, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, एकनाथ शंकर जांभुळकर, शैलेश सुरेश ओव्हाळ, शंकर भागोजी ओव्हाळ, अनिकेत ओव्हाळ, बुवा उर्फ गुलाब जाधव, ऋषिकेश ओव्हाळ (सर्व रा. कुरवंडे, ता. मावळ), गौतम सपकाळ (रा. खंडाळा, ता. मावळ), नासिर आरकटी (रा. लोणावळा), शेखर पाटील व एक अनोळखी व्यक्ती अशा दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्ष परमार यांचे वडील प्रवीणचंद्र परमार यांनी मावळ तालुक्यातील कुरवंडे येथे जमीन खरेदी केली होती. वडिलांच्या निधनानंतर काही व्यक्तींनी संगनमताने जुन्या स्टॅम्प पेपरचा गैरवापर करून गट क्रमांक २६७ या जागेचे बनावट खरेदीखत तयार केले. संबंधित दस्तऐवजावर खोट्या सह्या करून नोंदणी कार्यालयात शुल्क भरल्याचे भासविण्यात आले. चलनाद्वारे फी भरल्याचे दाखवून दस्तऐवज वैध असल्याचा आभास निर्माण करून जमीन स्वतःच्या नावावर नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२५ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना
इतर आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणी पोलिसांनी एकनाथ जांभुळकर, शैलेश ओव्हाळ, ऋषिकेश ओव्हाळ, गौतम सपकाळ व नासिर आरकटी यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव करीत आहेत. पोलिसांकडून संबंधित कागदपत्रांची पडताळणी, स्वाक्षरी तज्ज्ञांमार्फत परीक्षण तसेच नोंदणी कार्यालयातील नोंदींची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.






