Ministry of Foreign Affairs of Pakistan issued a press release condemning the ceremony in Ayodhya
Ministry of Foreign Affairs of Pakistan issued a press release condemning the ceremony in Ayodhya

  Ram Mandir Pranpratistha : अयोध्येत प्रूभ श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. देशात एक आनंदाचे वातावरण तयार झालेले पाहायला मिळाले. मात्र आपल्या शेजारी राष्ट्राला ही बाब रुचलेली नाही. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काही तासांनंतर पाकिस्तानने या सोहळ्याचा निषेध केला आहे.

  भारताच्या लोकशाही चेहऱ्याला एक काळा डाग

  पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक्सवर प्रसिद्धी पत्रक शेअर करण्यात आले आहे. “भारतामधील अयोध्या शहरातील बाबरी मशीद पाडून त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या राम मंदिराचा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आम्ही निषेध करतो”, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
  “अयोध्येत मशिदीच्या जागेवर मंदिर बांधल्यामुळे भारताच्या लोकशाही चेहऱ्याला एक काळा डाग लागला आहे. विशेष म्हणजे, यानंतर आता वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मुथरेतील शाही ईदगाह मशिदीचाही आता नंबर लागणार असल्याचे सांगतिले जाते. त्यामुळे ही यादी वाढतच जात आहे. या मशिदींनाही विनाशाचा सामना करावा लागलणार आहे”, असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

  “गेल्या ३१ वर्षांतील घडामोडी आणि आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाहिले तर भारतातील वाढत्या बहुसंख्यांकवादाचे हे सूचक उदाहरण दिसत आहे. यातून भारतातील मुस्लीमांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे”, असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

  मुस्लीम समुदाय आणि अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांना सुरक्षा

  पाकिस्तानने या पत्रकाच्या माध्यमातून भारतातील मुस्लीम समुदाय आणि अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळांना सुरक्षा पुरविण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानकडून भारताला उपेदश देण्यात येत असले तरी मानव अधिकार संस्थांच्या मतानुसार, उलट पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी यासारख्या धार्मिक अल्पसंख्याकांना सतत भेदभावाचा सामना करावा लागतो. सामाजिक बहिष्कार, मर्यादित संधी आणि हिंसाचार अशा अत्याचाराचा त्यात समावेश आहे.