ऑपरेशन टायगरला धक्का? ओमराजे-आष्टीकरांच्या घोषणेमुळे सहा खासदारांची सदस्यता धोक्यात
शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे. त्याआधी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही सत्ताधारी गटासोबत जाण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र या दोघांच्या स्वतंत्र घोषणांमुळेच आता उर्वरित बंडखोर खासदारांसमोर नवे कायदेशीर संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागेश पाटील आष्टीकर यांनी आपण कोणावरही नाराज नसल्याचे सांगत मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेची साथ आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. “लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. विकासकामांसाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केल्याने ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा सुरू झाली.
मात्र घटनात्मक आणि संसदीय नियमांच्या दृष्टीने या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा ट्विस्ट समोर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या पक्षाच्या संसदीय गटातील दोन तृतीयांश सदस्यांनी एकत्रितपणे वेगळा गट स्थापन केल्यास त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळू शकते. शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण नऊ खासदार असल्याने किमान सहा खासदारांनी एकाचवेळी वेगळा गट स्थापन केल्याचे अधिकृतपणे जाहीर करणे आवश्यक होते. परंतु आष्टीकर आणि ओमराजे यांनी स्वतंत्रपणे भूमिका जाहीर केली. इतर खासदारांनी अद्याप अधिकृतरीत्या पक्ष सोडल्याचे किंवा स्वतंत्र गट स्थापन केल्याचे जाहीर केलेले नाही. तसेच लोकसभा अध्यक्षांकडेही अशा कोणत्याही गटाच्या मान्यतेबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
यामुळे ठाकरे गटाला या दोन्ही खासदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जर दोन तृतीयांश सदस्यांचा स्वतंत्र गट अधिकृतपणे अस्तित्वात नसल्याचे मानले गेले, तर वैयक्तिकरित्या पक्षत्याग केल्याचा मुद्दा पुढे येऊ शकतो. दरम्यान, उर्वरित खासदारांची भूमिका काय असेल आणि लोकसभा अध्यक्षांकडे कोणती प्रक्रिया पार पडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पुढील वाटचालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Asthikar) यांनी थेट फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला. “मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय! मी बाळासाहेबांची विचारधारा सोडलेली नाही,” असे स्पष्ट करत आष्टीकरांनी आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे सामील झाल्याचे जाहीर केले. मतदारसंघात रखडलेली विकासकामे आणि निधीची चणचण यामुळेच आपण सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी परखडपणे कबूल केले आहे.
बंडखोरीचे मुख्य कारण स्पष्ट करताना नागेश पाटील आष्टीकर भावुक झाले. ते म्हणाले, “आम्ही सर्व ६ खासदार १८ जून २०२६ पर्यंत कुठेही गेलो नव्हतो. मात्र, त्या दिवशी मेळाव्यात ज्या पद्धतीने आमच्यावर अविश्वास दाखवला गेला, भाषेचा अतिरेक झाला आणि बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली, त्याने आमची मने दुखावली. तिथल्या वागणुकीमुळेच आता ‘उबाठा’ सेनेत थांबून काही उपयोग नाही, असा विचार सर्व सहकाऱ्यांनी केला.”






