उन्नाव : राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये पोहोचली. यादरम्यान, त्यांच्या यात्रेत ड्रोन दिसून आल्याने सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले.
लखनौ बायपासवरून भारत जोडो न्याय यात्रा शहरातून कानपूर रोडने गंगाघाटकडे निघाली. यात्रेसोबतच अकराच्या सुमारास राहुल गांधींचा ताफा उन्नाव शहरातून गंगाघाटच्या सहजनी तिराहा येथून मरहाळा चौकात पोहोचला, तिथे राहुल गांधी यांचा ताफा थांबला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना हात जोडून अभिवादन केले. मात्र, यादरम्यान एकच गोंधळ उडला. याठिकाणी राहुल गांधी यांच्या सुरक्षा पथकाला ड्रोन कॅमेरा दिसला आणि ही माहिती पोलिसांना देण्यात आली.
एक युवक ताब्यात
राहुल गांधी कारमधून बाहेर येताच त्यांच्या आजूबाजूला ड्रोन दिसला. त्यानंतर एका तरुणाला ड्रोन कॅमेऱ्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस सध्या या तरुणाची चौकशी करत आहेत. यादरम्यान, राहुल गांधी कुठेही जीपमधून खाली उतरले नाहीत, त्यांनी कार्यकर्त्यांना अभिवादन केले आणि थेट कानपूरच्या दिशेने रवाना झाले.






