पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी नौदलातील क्लार्कला अटक; मोबाईल चॅटिंगमधून धक्कादायक माहिती समोर...
नवी दिल्ली : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी नौदलातील एका क्लार्कला अटक केली. नौदल भवनातील अप्पर डिव्हिजन क्लार्क (यूडीसी) असलेल्या विशाल यादववर ही अटकेची कारवाई करण्यात आली. विशाल यादव हा सोशल मीडियाद्वारे गुप्त माहिती पाठवत असे. राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर शाखेने नवी दिल्ली येथून ही अटक केली.
याबाबत पोलिस महानिरीक्षक (सीआयडी-सुरक्षा) विष्णू कांत गुप्ता यांनी माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, यूडीसी विशाल यादवला बुधवारी (दि.२५) अटक करण्यात आली. यादव हा पुंसिका रेवाडी (हरियाणा) येथील रहिवासी आहे. राजस्थान पोलिसांचे ‘सीआयडी-गुप्तचर’ पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या हेरगिरी कारवायांवर सतत लक्ष ठेवून होते. त्यानुसार, आता ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, विशाल हा सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानला माहिती पाठवत असायचा. नौदल भवन दिल्लीतील ‘डॉकयार्ड डायरेक्टरेट’मध्ये काम करणारा विशाल यादव सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एका महिला हँडलरशी सतत संपर्कात असल्याचे समोर आले.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये विशाल यादवचे नाव समोर
यापूर्वी विशाल यादवचे नाव एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कशी आले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यानही त्याचे नावे पुढे आले. त्यावेळीही त्याने भारतीय नौदलाशी संबंधित संवेदनशील माहिती एका परदेशी एजन्सीला दिली होती. आता पुन्हा एकदा त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळाल्यानंतर राजस्थान इंटेलिजेंसने त्याला दिल्लीतून अटक केली.
हेरगिरीच्या बदल्यात पैसे
हेरगिरीच्या बदल्यात विशाल यादवला क्रिप्टो करन्सी USDT द्वारे पैसे दिले जात होते. ही रक्कम त्याच्या ट्रेंडिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जात होती, ज्याद्वारे तो गुप्तपणे त्याचे काम करत राहिला.