जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी एनआयए करणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली. पहलगाम येथे पर्यटकांना लक्ष्य करुन त्यांच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्यासाठी पाकिस्तानप्रेरित दहशतवादी गटांना जबाबदार धरले जात आहे, जरी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कोणताही सहभाग नाकारला असून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपावला आहे.
पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेल्यामुळे देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. भारताने कठोर भूमिका घ्यावी अशी देखील मागणी केली जात आहे. पहलगाम हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनएआय करणार आहे. हल्लाचा औपराचिक तपास करण्यासाठी एनआयएकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. याबाबत गृह विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हल्ला झाल्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा पहलगाम येथे तपास करत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रीय तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून या हल्ल्याशी संबंधित आतापर्यंत मिळालेली माहिती, केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेईल आणि पुढील तपास सुरू करेल. पहलगमामधील हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिकांच्या, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. परिणामी येथील सुरक्षेची जबाबदारी प्रमुख दहशतवादविरोधी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. एनआयए लवकरच या हल्ल्याच्या सर्व संबंधांचा सखोल तपास करेल. हल्ल्याचा कट कोणी व कुठे रचला? यामध्ये सहभागी दहशतवादी संघटना, त्यांची भूमिका, स्लीपर सेलचा संभाव्य धोका याविषयीचा तपास करून लवकरच गृह मंत्रालयाला अहवाल सादर करेल.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराची आक्रमक कारवाई
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे. काश्मीरमध्ये अतिरेकी आणि त्यांच्या समर्थकांवर विशेष मोहिम राबवली जात आहे. अतिरेक्यांना आश्रय देणाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांच्या घरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचे किंवा त्यांच्या समर्थकांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तसेच, लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर सतत छापे टाकले जात आहेत आणि शेकडो संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा खोऱ्यातील प्रत्येक अतिरेक्याचा शोध घेत असून, अशा प्रकारचा आणखी एक हल्ला घडू नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पहलगाम हल्ल्याबाबत बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताचा निर्धार भक्कम
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेचा स्तर अधिक मजबूत करण्यात आला आहे आणि दहशतवाद्यांविरुद्ध निर्णायक मोहिम राबवली जात आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनांना भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही, याचे ठोस संकेत दिले आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांती व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या अशा कुरापतींना आता कडवे उत्तर देण्याचा भारताचा निर्धार स्पष्टपणे दिसून येतो आहे.