पाटणा : सध्या तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidue) आणि संयुक्त जनता दलाचे नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या पाठिंब्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी त्यांचा प्रमुख मित्रपक्ष भाजपला पहिला मोठा धक्का दिल्याचे मानले जाते. चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहून त्यांनी थेट भाजपलाच संदेश दिल्याचे सांगण्यात येते.
नितीश कुमार शपथविधी सोहळ्यापासून दूर राहिल्याने ते भाजपच्या मनमानी कारभारावर नाराज असल्याच्या अटकळांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. एनडीएमध्ये वातावरण बिघडू लागल्याचा विरोधकांचा दावा आहे. मंत्रिमंडळ विभाजनावर नितीश खूश नाहीत. भाजपने त्यांना केवळ एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिले आहे. त्यातही पंचायत राजसारखे द्वितीय श्रेणी खाते मिळाल्याने नितीश नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपला आधीच सांगण्यात आले होते की, खासदारांच्या संख्येनुसार त्यांना मंत्रिपदे मिळत नसतील तर किमान त्यांना रेल्वेसारखे चांगले मंत्रालय द्यावे. मात्र, खाते वाटप करताना या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे जेडीयूच्या सूत्रांनी सांगितले.
याबाबत राजदचे प्रवक्ते एजाज अहमद यांनी म्हटले की, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु हे अगदी स्पष्ट आहे की, एनडीएमध्ये सर्व काही ठीक चालले नाही आणि असे झटके येतच राहतील. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच तेजस्वी यादव यांनी अशाच निकालांची भविष्यवाणी केली होती.