Photo Credit- Social Media दिल्लीनंतर पंजाबमध्येही मुख्यमंत्री बदलणार? केजरीवालांच्या दौऱ्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ
पंजाब: दिल्लीतील आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्या जाण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री भगवंत मान हसून प्रतिक्रिया दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला झालेल्या पराभवानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी असा दावा केला की, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री भगवंत मान यांना या चर्चांबाबत विचारले असता, त्यांनी हसून उत्तर दिले, “त्यांना म्हणू द्या.” तसेच, पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याच्या काँग्रेसच्या दाव्यालाही त्यांनी साफ नकार दिला आणि पक्षातील नेते व कार्यकर्ते पूर्णपणे पक्षासाठी समर्पित असल्याचे स्पष्ट केले.
मंगळवारी (11 फेब्रुवारी) पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मंत्री आणि आमदार यांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या बैठकीनंतर सीएम भगवंत मान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी पंजाबमधील सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी केलेल्या प्रयत्नांसाठी केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले.
पोलिस असल्याची बतावणी, दागिने ठेवण्याचा बहाणा; शिक्रापुरातील महिलेला लुटले
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले की, पंजाबमध्ये आपली सरकार लोकहिताची कामे सातत्याने करत आहे. मग ती वीज, शिक्षण, पायाभूत सुविधा किंवा रुग्णालयांची सुधारणा असो, आपला पक्ष प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे आणि यामध्ये आणखी गती आणायची आहे. “दिल्लीतील लोक सांगतात की, गेल्या 75 वर्षांत असे काम न पाहिले आणि न ऐकले, जेवढे आम आदमी पक्षाने केले आहे. विजय-पराजय होतच राहतो, पण दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या अनुभवाचा उपयोग आम्ही पंजाबमध्ये करणार आहोत.”
याशिवाय, मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करायचे आहे. आम आदमी पक्ष केवळ आपल्या कामामुळे ओळखला जातो. आम्ही कोणत्याही धर्मावर आधारित राजकारण करत नाही, पैशांचे वाटप किंवा गुंडगिरी करत नाही. आजच्या बैठकीत दिल्लीतली संपूर्ण टीम सहभागी होती. अद्याप दोन वर्षे शिल्लक आहेत आणि या काळात पंजाबला असे मॉडेल बनवू, जे संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल.”