संग्रहित फोटो
शिक्रापूर : राज्यात लुटमारीच्या घटना वाढत असून, यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. अशातचं आता शिरुर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील प्रतिभा पनिकर या रस्त्यावरुन निघालेल्या असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पोलिस असल्याची बतावणी करत अडीच तोळ्याचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी प्रतिभा सतीशन पनिकर (वय ५०, रा. त्रिमूर्ती नगर शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. हॉटेल निखील समोर हा प्रकार घडला.
प्रतिभा पनिकर या निघालेल्या होत्या. यादरम्यान चोरट्यांनी त्यांना पोलिस असल्याचे सांगत गावामध्ये चोऱ्या होते आहे, महिलांचे गळ्यातील दागिने कापून नेत आहेत असे सांगितले. तसेच पनिकर यांच्या गळ्यातील दागिने पेपरमध्ये गुंडाळून पर्समध्ये ठेवण्यास सांगून हातचलाखी करत प्रतिभा यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे दागिने हातचलाखीने काढून घेत त्यांनी दुचाकीवरुन पोबारा केला. याबाबत प्रतिभा पनिकर यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, पोलिसांनी दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर तरुणाला लूटले; कोयत्याचा धाक दाखविला अन्…
शिरुरनंतर शिक्रापूरमधील घटनेने तालुक्यात खळबळ
शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथे दोन दिवसांपूर्वी एका ज्येष्ठाला पोलीस असल्याच्या बहाण्याने लुटल्याची घटना ताजी असताना लगेचच शिक्रापूर येथे अशीच घटना घडली. या दोन्ही घटनेने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.