Education, Age, Occupation of Newly Elected MPs in Lok Sabha
नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. नव्या लोकसभेत अनेक खास गोष्टी आहेत. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या राज्यातून निवडून आलेल्या या खासदारांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आपण निवडून दिलेला उमेदवार किती शिकलेला आहे, किती उमेदवार पहिल्यांदाच निवडून आलेत, ते काय करतात, याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल असते. याबाबत या लेखात जाणून घेणार आहोत.
या लोकसभेतील नवनिर्वाचित खासदारांपैकी 78 टक्के खासदारांनी पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले आहे. तर 22 टक्के खासदार आहेत ज्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतले नाही. 17 व्या लोकसभेत अशा खासदारांची संख्या 27 टक्के होती. म्हणजे यावेळी महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या खासदारांची संख्या वाढली आहे.
व्यवसायाचा विचार करता, 48 टक्के खासदार सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर 37 टक्के शेती, 32 टक्के व्यापार आणि व्यवसाय, 7 टक्के न्यायशास्त्रज्ञ आणि न्यायाधीश आहेत, चार टक्के वैद्यकीय आणि पॅरामेडिकल क्षेत्रातील आहेत. तीन टक्के खासदार कला आणि मनोरंजन क्षेत्रातील आहेत तर दोन टक्के सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत.
18व्या लोकसभेत 240 जागांसह भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 98 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, तर समाजवादी पक्ष 37 जागांसह तिसऱ्या स्थावर आहे. तृणमूल काँग्रेस 29 जागांसह चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
लोकसभेतील खासदारांचे वय पाहिल्यास सर्वाधिक 166 खासदार 50-60 या वयोगटातील आहेत. तर 161 खासदार 60-70 या वयोगटातील, 110 हे 40-50 वयोगटातील, तर 52 खासदार 70-80 वयोगटातील आहेत. 45 खासदार 30-40 वयोगटातील आहेत, 7 खासदार हे 20-30 या वयोगटातील आणि संसदेतील केवळ एक खासदार असे आहेत ज्यांचे वय 80 वर्षांहून अधिक आहेत. यातील ३४६ खासदारांनी राष्ट्रीय पक्षांकडून निवडणुका लढल्या आणि जिंकल्या आहेत. 179 खासदार राज्यस्तरीय पक्षांमधून निवडून आले आहेत. तर, 11 खासदार अपरिचित पक्षांचे आहेत आणि सात अपक्ष आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 281 खासदार (52 टक्के) आहेत जे निवडणूक जिंकून पहिल्यांदाच संसदेत पोहोचले आहेत. 17व्या लोकसभेत ही संख्या 267 होती, मात्र 2014 मध्ये 16व्या लोकसभेसाठी पहिल्यांदाच विजयी होऊन विक्रमी 314 खासदार सभागृहात पोहोचले. दोन खासदार आठव्यांदा सभागृहात पोहोचले. 18व्या लोकसभेत 35 चार टर्म खासदार, 19 पाच टर्म खासदार, 114 दोन टर्म खासदार, 74 तीन टर्म खासदार, 10 सहा टर्म खासदार, सात सात टर्म खासदार आणि दोन आठ टर्म खासदार निवडून आले आहेत. .