पंतप्रधान मोदींनी पैशांनी भरलेल्या कपाटांचा फोटो ट्विट करीत नागरिकांना केले आवाहन; म्हणाले, ‘या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर….’

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या बौद्ध डिस्टलरी प्रा. लि. कंपनीवर बुधवारपासून छापेमारी सुरू आहे. यामध्ये २०० कोटींहून अधिकची रोकड आढळून आली आहे.

  PM Narendra Modi Post : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (जुने ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर टाकलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ओडिशा आणि झारखंड येथे प्राप्तीकर विभागाने छापेमारी करून जप्त केलेल्या रोख रकमेचा उल्लेख केला आहे.

  काँग्रेसवर जोरदार टीका

  “देशातील नागरिकांनी या नोटांच्या ढिगाऱ्याकडे पाहावे आणि नंतर त्यांच्या (काँग्रेसच्या) इमानदार नेत्यांची भाषणे ऐकावित, जनतेकडून लुटलेल्या पै-पैचा हिशेब द्यावा लागेल. ही मोदीची गॅरंटी आहे”, अशी पोस्ट टाकून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

  हा आकडा २५० कोटींच्या आसपास

  प्राप्तीकर विभागाने बुधवारी बौद्ध डिस्टिलरी प्रा. लि. कंपनीवर धाड टाकली, तेव्हापासून जप्त रोकड मोजण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २०० कोटींहून अधिकची रक्कम मोजली असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा २५० कोटींच्या आसपास आहे.

  पश्चिम बंगाल राज्यातील १० ठिकाणांवर कारवाई

  प्राप्तीकर विभागाने काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित झारखंड, ओडिसा आणि पश्चिम बंगाल राज्यातील १० ठिकाणांवर कारवाई केली. ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर २०० कोटींहून अधिकची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ओडिशामध्ये सर्वाधिक रोकड सापडली आहे. ६ डिसेंबरपासून सुरू असलेली कारवाई अद्यापही सुरू आहे.

  प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना १५० हून अधिक बॅग्स

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यातील सुदापाडा येथे छापेमारी केली असता प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना १५० हून अधिक बॅग्स आढळून आल्या आहेत. ज्यामध्ये रोख रक्कम भरलेली आहे. प्राप्तीकर विभागाने छापेमारीच्या ठिकाणी नोटा मोजणारी डझनाहून अधिक यंत्र आणले असून तेही आता कमी पडू लागले आहेत. त्यामुळे रोख रकमेची मोजणी संथगतीने सुरू आहे.

  पीटीआय या वृत्तसंस्थेने साहू यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, सदर कारवाईवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी विरोध केला. सूत्रांनी सांगितले की, प्राप्तीकर विभागाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर सदरची कारवाई केली. मद्य वितरक, विक्रेते आणि व्यावसायिक गटांकडून मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा व्यवहार होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती.

  कोण आहेत खासदार धीरज साहू?
  खासदार धीरज साहू हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. जुलै २०२० मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेवर गेले होते. काँग्रेस पक्षाकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. धीरज साहू हे झारखंड राज्यातील आहेत. झारखंडमधील ते काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात.