महाबळेश्वरमधील ‘हाय अल्टिट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी’ (HACPL) येथे सुमारे १४०० मीटर उंचीवर स्थापित करण्यात आलेले हे रडार पुणे, सातारा तसेच मुंबईच्या काही भागांसाठी हवामान अंदाज क्षमतेत मोठी भर घालणार आहे. विशेषतः ‘नाऊकास्टिंग’ (तात्काळ हवामान अंदाज) क्षमता आता ६ तासांपर्यंत वाढणार असून मेघगर्जना, अतिवृष्टी आणि वादळी प्रणालींचा अचूक मागोवा घेणे शक्य होणार आहे.
या अत्याधुनिक प्रणालीमुळे ढगांची सूक्ष्म रचना (क्लाउड मायक्रोफिजिक्स), पर्जन्याचे स्वरूप, थेंबांचे आकार व वितरण तसेच वादळांची अंतर्गत संरचना याबाबत उच्च विभेदनातील (हाय-रेझोल्यूशन) माहिती मिळणार आहे. परिणामी, अतिवृष्टी, ढगफुटी, धुके आणि वेगवान वाऱ्यांच्या घटनांचे अधिक अचूक वर्गीकरण व अंदाज शक्य होणार आहेत.
ही रडार प्रणाली सॉलिड-स्टेट पॉवर ॲम्प्लिफायर तंत्रज्ञानावर आधारित असून ऊर्जा कार्यक्षम आणि कमी देखभाल खर्चाची आहे. पश्चिम घाटातील भौगोलिकदृष्ट्या जटिल व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात हवामान बदलांचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
तसेच, या रडारमधून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग हवामान व हवामानबदल मॉडेल्स अधिक सक्षम करण्यासाठी होणार असून अत्यंत तीव्र हवामान घटनांच्या (एक्स्ट्रीम वेदर) अचूक अंदाजात लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. पूरस्थितीची पूर्वसूचना, विमान वाहतूक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, कृषी सल्ला सेवा आणि जलसंपदा नियोजनासाठीही ही प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
दरम्यान, आयआयटीएम आणि इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटर यांच्यात हवामान उत्पादने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. उपग्रह आणि भूमीवरील निरीक्षणांचे एकत्रीकरण, अंदाज अचूकता वाढविणे आणि हवामान संशोधन क्षमतेचा विकास या करारातून साध्य होणार आहे. एकूणच, महाबळेश्वर येथील अत्याधुनिक रडार प्रकल्पामुळे देशातील हवामान विज्ञानाला नवे बळ मिळणार असून अचूक अंदाज आणि वेळीच इशारा देण्याच्या क्षमतेत मोठी झेप घेतली जाणार आहे.
राजवाडा चौपाटीवर ‘स्वच्छता-शिस्त संहिता’ लागू; व्यावसायिकांची एकजूट, कठोर निर्णयांची अंमलबजावणी






