रांची : झारखंडची राजधानी रांचीच्या हटिया रेल्वे स्थानकापासून सुरु होणाऱ्या हटिया-एर्नाकुलम एक्स्प्रेसचा बोर्ड मल्याळममध्ये चुकून हत्या एर्नाकुलम एक्सप्रेस असे लिहिल्याने सोशल मीडियात व्हायरल झाला होता. यामुळे रेल्वे प्रशासनावर सोशल मीडियातून टीकाही होत आहे.
गुगल ट्रान्सलेटरची मदत
व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. रेल्वेच्या या चुकीबाबत हटिया विभागाचे डीसीएम निशांत कुमार यांनी सांगतले की, ‘नेम प्लेटचं भाषांतर करताना गुगलची मदत घेण्यात आली होती. गुगलमध्ये जो काही शब्द दिसला, तो नेम प्लेटवर टाकून कर्मचाऱ्यांनी बोर्ड बसविला. ईशान्य भारतातील बहुतांश लोकांना मल्याळम भाषा येत नाही. त्यामुळे कोणी लक्ष दिले नाही. रांची ते एर्नाकुलम अशी ट्रेन बरेच दिवस त्याच नावाने धावत राहिली. मात्र, ही चूक सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस येताच हटिया रेल्वे विभागानं तत्काळ त्या प्रकारातील सर्व फलक बदलून ती दुरुस्त केली.
नेमके काय आहे प्रकरण?
रांची (हटिया) ते एर्नाकुलम धावणाऱ्या ट्रेनच्या नेम प्लेटवर तीन भाषांमध्ये हटिया एक्सप्रेस असे नाव लिहिलेले होते. हटिया इंग्रजी, हिंदी आणि मल्याळम भाषेत लिहिलेलं होतं. हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिलेले हटिया एक्सप्रेस बरोबर होते. परंतु मल्याळममध्ये लिहिलेला हटिया हा शब्द चुकीचा लिहिला गेला. मल्याळममध्ये लिहिलेल्या हटिया शब्दाचा अर्थ म्हणजे हिंदीत हत्या होतो.
रेल्वेनं भाषांतर केल्यानंतर, मल्याळममध्ये लिहिलेला शब्द ‘कोलापथकम’ आहे. त्याला हिंदीत हत्या म्हणतात. या बिघाडामुळे अनेक दिवस हटिया एर्नाकुलम एक्स्प्रेस रांची ते एर्नाकुलम धावत होती. पण त्याच दरम्यान एका प्रवाशानं नेम प्लेट पाहिली. त्या फोटो काढून सोशल मीडियालर पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाली.