अयोध्येत UP ATSची मोठी कारवाई! तीन संशयितांना घेतलं ताब्यात

मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथकाने अयोध्येमध्ये मोठी कारवाई केली आहे. एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

    अयोध्या : अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अयोध्येबरोबर (Ayodhya) देशभरातील भक्त या सोहळ्यासाठी आतुर झाले आहेत. मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथकाने (ATS UP) अयोध्येमध्ये मोठी कारवाई केली आहे. एटीएसने (ATS) दहशदवादी संघटनेशी संबंधित तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

    अयोध्येमधून खालिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरुन तीन जणांना अटक करण्यात आली. यूपी एटीएस आणि इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या संशयितांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची पुढील चौकशी सुरु आहे. मात्र अद्याप या तरुणांची कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची पुष्टी झालेली नसल्याची माहिती डीजी प्रशांत कुमार यांनी दिली. दरम्यान ताब्यात घेतलेल्या तरुणांपैकी दोन तरुण राजस्थानमधील सीकर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

    बहुचर्चित रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून सर्वच क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. देशासोबत परदेशातून देखील या मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे येणार आहेत. त्यापूर्वी एटीएसकडून ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून सोहळ्यासाठी खास सुरक्षिततेची तयारी करण्यात आली आहे. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात एटीएस कमांडो तैनात करण्यात आले आहेत. युपी पोलिसांनी 360-डिग्री सुरक्षा कव्हरेज प्रदान करण्यासाठी अँटी-माइन ड्रोन देखील तैनात करण्यात आले आहेत.