सौजन्य - नवराष्ट्र टीम
नीरा : जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झाला नसल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीरा-देवघर, वीर, भाटघर आणि गुंजवणी या चारही धरणांतील पाणीसाठा कमी असल्याचे चित्र समोर आले आहे. सध्या या चार धरणांमध्ये मिळून केवळ ५.२३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, तो एकूण क्षमतेच्या सुमारे १०.८४ टक्क्यांपर्यंतच मर्यादित आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी तो २१.४९ टक्के होता.
खरीप हंगामाच्या तोंडावर धरणांतील ही स्थिती शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी लावलेली नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागून राहिले आहे. अनेक भागांमध्ये पेरणीची तयारी पूर्ण झाली असली तरी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.
वीर धरणात १.७१७ टीएमसी म्हणजे १८.२५ टक्के, निरा-देवघरमध्ये १.०१६ टीएमसी म्हणजे ८.६५ टक्के, भाटघरमध्ये १.८४४ टीएमसी म्हणजे ७.८५ टक्के तर गुंजवणी धरणात अवघा ०.६६२ टीएमसी म्हणजे १७.९३ टक्के असे एकूण चारही धरणात एकुण ५.२३८ टिएमसी म्हणजे १०.८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये १०.३८८ टिएमसी म्हणजे २१.४९ टक्के अधिक पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाच्या तुलनेत परिस्थिती काहीशी चिंताजनक मानली जात आहे.
शेतकरी सध्या आवर्तनांवर अवलंबून
नीरा उजवा कालवा आणि डावा कालवा परिसरातील शेतकरी सध्या आवर्तनांवर अवलंबून आहेत. कालव्यांमधून सुरू असलेले आवर्तन मागील दोन दिवसांत बंद झाला असल्याने पुढील काळात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची गरज भागवताना जलसंपदा विभागासमोरही मोठे आव्हान उभे राहणार आहे. “पाऊस वेळेत आणि मुबलक झाला तरच धरणांतील साठ्यात वाढ होईल, अन्यथा खरीप हंगाम धोक्यात येऊ शकतो,” अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि तुरळक सरी पडत असल्या तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण
नीरा खोऱ्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आशा आता मान्सूनच्या पुढील वाटचालीवर अवलंबून असून, धरणांतील घटता साठा आणि पावसाचा विलंब यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने लवकरच जोरदार हजेरी लावावी, अशीच प्रार्थना शेतकरी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वीर धरणाच्या पाणीपातळीत २०१९ नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. धरणाच्या दोन्ही कालव्यातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन म्हणून उर्वरित पाणीसाठा शिल्लक आहे. -राहुल मिसाळ, उपविभागीय अधिकारी.
पेयजल योजनांवर परिणाम होण्याची शक्यता
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक छोटे जलाशय असून, त्यांचाही पाणी साठा संपुष्टात आला आहे. धरणातून पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्राला शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी वीर धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागतो. तसेच, पुणे जिल्ह्यातील सासवड व सातारा जिल्ह्यातील लोणंद शहरांना पाणीपुरवठा योजना सुरू असून, अनेक गावच्या पेयजल योजना अवलंबून आहेत. या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






