राणाने रचला होता देशभर हल्ल्याचा कट; NIA च्या चौकशीत खळबळजनक खुलासा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतले. राणाचे प्रत्यार्पण करुन भारतात आणल्यानंतर लगेच त्याला एनआयएने दिल्लीच्या पालम विमानतळावरूनच ताब्यात घेतले. त्याला १८ दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, तहव्वूर राणा हा मुंबई प्रमाणेच भारतातील इतरही शहरांमध्ये हल्ल्याचा कट रचत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने शुक्रवारी तहव्वूर राणाची चौकशी सुरू केली.
पहिल्या टप्प्यात एनआयए अधिकाऱ्यांनी राणाची शुक्रवारी सलग ३ तास चौकशी केली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याची आणखी दोन टप्प्यात चौकशी करण्यात आली. एनआयएच्या मुख्यालयात एका खास कक्षात राणाला ठेवण्यात आले आहे. या कक्षावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २४ तास लक्ष ठेवले जात आहे.
त्या वकिलांचे पुणे कनेक्शन: मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वुर राणाला न्यायालयात शिक्षेपासून वाचवण्याची जबाबदारी ज्या वकिलावर आहे. त्याचे पुण्याशीही नाते आहे. दिल्ली राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाच्या पॅनेलमध्ये सूचीबद्ध असलेले ३७ वर्षीय वकील पीयूष सचदेवा यांना न्यायालयाने तहव्वुर राणा यांचा बचाव करण्याची जबाबदारी दिली आहे. भारतीय
संविधानात अशी तरतूद आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांपासून शेवटपर्यंत स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. जर एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा वकील नसेल. त्याला संबंधित राज्य किवा केंद्र सरकारकडून वकील उपलब्ध करून दिला जातो. जेणेकरून त्याला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार मिळेल.
फक्त पैसे नाहीत किंवा त्याचा खटला लढणारा वकील नाही म्हणून त्याला यापासून वंचित ठेवता कामा नये. पियुष सचदेवाने पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण केले. यानंतर त्यांनी किंग्ज कॉलेज लंडनमधून एलएलएम पदवी प्राप्त केली. तो गेल्या दशकाहून अधिक काळ वकिली करत आहे. या काळात त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल खटलेही लढले आहेत.
सूत्रांनुसार, एनआयएने आपला तपास प्रामुख्याने चार मुद्द्यांवर केंद्रित केला आहे. एक, हा हल्ला करण्यासाठी आर्थिक व्यवस्था कशी करण्यात आली. दोन, ज्यांनी तहव्वूर राणाला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळवून देण्यास मदत केली. देशभर फिरण्यासाठी त्याला संसाधने आणि सुविधा कोण पुरवत होते? तीन, भारतातील किती शहरांमध्ये हल्ले नियोजित होते. यामध्ये स्थानिक पाठिंबा किंवा रसद आणि मदत कोण देत होते ? चौथा, ज्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या हल्ल्याला पाठिंबा दिला. या हल्ल्यादरम्यान कोण निर्देश देत होते? या हल्ल्यात कोणत्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा सहभाग होता ?