Photo Credit : Social Media
नवी दिल्ली: बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांच्यावर गृह मंत्रालयाने मोठी कारवाई केली असून त्यांना पदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी बीएसएफचे विशेष डीजी वायबी खुरानिया यांनाही हटवून ओडिशा कॅडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. तर नितीन अग्रवाल यांना त्यांच्या मूळ कॅडर केरळला परत पाठवण्यात आहे. डीजी बीएसएफ आणि स्पेशल डीजी बीएसएफ यांना हटवण्यामागे गेल्या एक वर्षापासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेली दहशतवाद्यांची घुसखोरी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत भारत सरकारची ही सर्वात मोठी प्रशासकीय कारवाई आहे, ज्याचा ठपका सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पडला आहे. याशिवाय पंजाब सेक्टरमधून सतत होणाऱ्या दहशतवादी घुसखोरीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश हेही या कारवाईचे प्रमुख कारण मानले जात आहे. कोणत्याही निमलष्करी दलाचे नेतृत्व करणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा प्रकारे हटवण्याची गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. लवकरच नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
डीजी बीएसएफ नितीन अग्रवाल हे 1989 च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत, तर खुरानिया हे 1990 बॅचचे ओडिशा कॅडरचे अधिकारी आहेत. अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. तर खुरानिया हे विशेष महासंचालक (पश्चिम) म्हणून पाकिस्तान सीमेवर सैन्याच्या निर्मितीचे नेतृत्व करत होते.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) जारी केलेल्या स्वतंत्र आदेशात म्हटले आहे की या दोघांंनाही ‘तात्काळ प्रभावाने आणि वेळेच्या आधी परत पाठवले जात आहे. एका अहवालानुसार सुमारे 2.65 लाख जवानांसह बीएसएफ पश्चिमेला पाकिस्तान आणि पूर्वेला बांगलादेशसोबतच्या भारतीय सीमांचे रक्षण करते.