आज राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांसोबतच महान स्वातंत्र्य सेनानी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांची देखील ११९ वी जयंती आहे. लाल बहादूर शास्त्री हे राजकारणात सक्रिय असताना त्यांच्या साधेपणासाठी फार प्रसिद्ध होते. सध्याच्या काळात जेथे नव्याने निवडून आलेला साध्या नगरसेवकाच्या दारात सहा महिन्यात एक नवी आलिशान गाडी उभी राहते, मात्र पंतप्रधान असताना लाल बहादूर शास्त्रींनी कार खरेदी करण्यासाठी स्वतः बँकेत कर्ज घेण्यासाठी गेले होते. काय आहे ती पूर्ण घटना जाणून घेऊयात:
लाल बहादूर शास्त्री यांची मुलं त्यांना सांगायची की, पंतप्रधान झाल्यावर तुमच्याकडे गाडी असायला हवी. कुटुंबीयांच्या सांगण्यावरून शास्त्रीजींनी कार घेण्याचा विचार केला. तेव्हा आजच्यासारखी बँक बॅलन्स माहीत नव्हती. त्यांनी बँकेकडून त्यांच्या खात्याची माहिती मागितली असता त्यांच्या बँक खात्यात फक्त ७ हजार रुपये असल्याचे समोर आले. त्यावेळी कारची किंमत १२ हजार रुपये होती. कार खरेदी करण्यासाठी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेतले. ५ हजार रुपयांचे कर्ज घेताना शास्त्रीजींनी बँक अधिकाऱ्याला सांगितले की, ‘मला जशी सुविधा मिळत आहे तशीच सुविधा सर्वसामान्य नागरिकांनाही मिळायला हवी’.
शास्त्रीजींच्या जवळच्या व्यक्ती सांगतात की, शास्त्रीजींनी गाडी खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी (Indira Gandhi) पंतप्रधान झाल्या होत्या. त्यांनी हे कर्ज माफ करण्याची तयारी दर्शवली. परंतु शास्त्रीजींच्या पत्नी ललिता शास्त्री यांनी याकरता नकार दिला आणि शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर गाडीचा ईएमआयचे हप्ते जमा करत राहिल्या आणि त्या कारचे कर्ज त्यांच्या कुटुंबाने पूर्ण फेडले.