नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक संपली आहे. त्यानंतर आता भाजपचे पुढील अध्यक्ष म्हणून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. चौहान यांच्याशिवाय हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे.
भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने या दोन्ही नेत्यांना दिल्ली गाठण्याचा संदेश दिला आहे. शिवराज सिंह चौहान यांचेही नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येत आहे. पक्षाध्यक्ष झाल्यास ते स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर होतील, असे मानले जात आहे. मात्र, या महिन्याच्या अखेरीस पक्षाध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. त्यावेळी काही अनपेक्षित नावही दिसू शकते. तोपर्यंत कोणाच्याही नावांची अटकळच राहील.
मोदींची पहिली पसंती खट्टरांना
भाजपा अध्यक्षपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली पसंती मनोहरलाल खट्टर असल्याची चर्चा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते पंतप्रधानांचे विश्वासू आहेत. पंतप्रधान आणि खट्टर यांचे संबंध त्या काळापासूनचे आहेत. जेव्हा हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या जुन्या सहकाऱ्यांना विसरत नाहीत, असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या सर्व जुन्या सहकाऱ्यांना संधी मिळताच उच्च पदांवर नियुक्त केले आहे.