विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण मिळणार (फोटो- istockphoto )
विद्यार्थ्यांना आता अपघात विमा संरक्षण मिळणार
वैद्यकीय विमा पूर्वीप्रमाणे ऐच्छिकच
तीन वर्षांसाठी नोडल एजन्सी निवडणार
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी लागू असलेल्या स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा अनिवार्य करण्यात आला असून, पुढील तीन वर्षांसाठी इन्शुरन्स ब्रोकर्स नोडल एजन्सीची निवड करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय उप सचिव प्रताप पां. लुबाळ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार जारी केला आहे.
शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि त्यांच्या संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अपघात विमा योजना आता अनिवार्य करण्यात आली आहे. याआधी ही योजना ऐच्छिक स्वरूपाची होती. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने हा महत्त्वाचा बदल केला आहे.
तथापि, ज्या विद्यापीठांकडे कमी हप्त्यात अधिक संरक्षण देणारी स्वतंत्र विमा योजना आधीपासून कार्यरत असेल, त्या विद्यापीठांना ती योजना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र यासाठी संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांची पूर्वसंमती आवश्यक राहणार आहे.
वैद्यकीय विमा पूर्वीप्रमाणे ऐच्छिकच
या योजनेअंतर्गत असलेला विद्यार्थी वैद्यकीय विमा मात्र पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना तो घ्यायचा की नाही, याचा निर्णय स्वतंत्रपणे घेता येणार आहे.
तीन वर्षांसाठी नोडल एजन्सी निवडणार
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पुढील तीन वर्षांसाठी इन्शुरन्स ब्रोकर्स नोडल एजन्सीची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या संदर्भातील पुढील कार्यवाही संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून करण्यात येणार असून, त्यांचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला जाणार आहे.






