सौजन्य : सोशल मीडिया
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी सुलतानपूर एमपीएमएलए न्यायालयात आत्मसमर्पण केले. यानंतर संजय सिंह यांनी सादर केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली.
संजय सिंह हे आम आदमी पक्षातील नेत्यांपैकी एक असून, ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच आरोपाशी संबंधित एका प्रकरणात एमपीएमएलए न्यायालयाने संजय सिंह यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या खटल्याच्या सुनावणीला ते हजर झाले नसते तर न्यायालयाकडून त्यांच्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाणार होती. ही शक्यता पाहून संजय सिंह यांनी सुलतानपूर एमपीएमएलए कोर्टात आत्मसमर्पण केले.
दरम्यान, संजय सिंह यांनी कोर्टात हजर राहिल्यानंतर जामिनासाठी अर्ज देखील केला होता. त्यांच्या याप्रकरणाच्या सुनावणीनंतर विशेष दंडाधिकारी शुभम वर्मा यांच्या न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे संजय सिंह यांना एकप्रकारे दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.
भाजप हा हिंसक विचारसरणीचा पक्ष
भाजप हा हिंसक विचारसरणीचा पक्ष आहे, हे एकदा नाही तर लाखो वेळा बोलले जाईल. नरेंद्र मोदी हिंसक विचारसरणीला चालना देण्याचे काम करतात. हे एकदा नव्हे तर लाखो वेळा म्हटले जाऊ शकते. हिंदू धर्म आणि हिंदू समाजाला बदनाम करण्याचे काम नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक करत आहेत. अयोध्येतील पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी ‘जय श्रीराम’ म्हणणे बंद केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.