
EC hearing on NCP Symbol : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. कारण निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगात अतिशय महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीला स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे हजर आहेत. त्यामुळे या सुनावणीचे महत्त्व आणखी जास्त वाढले आहे. या सुनावणीत निवडणूक आयोग काही मोठा निर्णय जाहीर करते का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? या संबंधित याचिकेवर आज सुनावणी पार पडत आहे. या सुनाणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: सुनावणीसाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झाले आहेत. त्यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड सुनावणीसाठी हजर आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हेदेखील निवडणूक आयोगात दाखल आहेत.
दोन्ही गटांकडून एकूण 18 ते 20 जण हजर
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रतिज्ञा सादर करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी दोन्ही गटांकडून एकूण 18 ते 20 जण आले आहेत. त्यामुळे आज निवडणूक आयोगाकडून मोठी काही घोषणा होते का? ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन्ही गटांचा आज होणार युक्तिवाद
याआधी अजित पवार यांच्या गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता. अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी भूमिका मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. त्यामुळे निवडणूक आयोग युक्तिवादासाठी वेळ वाढवून देते का? की शरद पवार यांच्या गटाचा युक्तिवाद आज सुरु होतो? याकडे राज्याचं लक्ष आहे. दोन्ही गटाचा आज युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोग आज निकाल राखून ठेवून निकालाची तारीख जाहीर करते का? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
शरद पवार गटाच्या वकिलांकडून युक्तिवादाला सुरुवात
गेल्या सुनावणीवेळी अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यामुळे सुनावणी सुरु झाल्यानंतर आज अजित पवार यांच्या गटाकडून युक्तिवादाला सुरुवात करण्यात आलीय. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाकडून सुरुवातीला दोन्ही गटाचा पूर्ण युक्तिवाद ऐकून घेतला जाईल. त्यामुळे आज शरद पवार गटाला युक्तिवादाची संधी देण्यात आलीय. गेल्या सुनावणीत अजित पवार गटाने बाजू मांडली होती. त्याला उत्तर म्हणून आज अभिषेक मनु सिघवी बाजू मांडत आहेत. शरद पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडत आहेत.