पावसामुळे पर्वतीय प्रदेशात हाहाकार माजला
नवी दिल्ली : सध्या नैऋत्य मान्सून देशाच्या जवळपास प्रत्येक भागात पोहोचला आहे. हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही भागांमध्ये अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. मान्सूनमुळे पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये कडक उन्हापासून दिलासा मिळाला आहे, परंतु डोंगराळ राज्यांमध्ये मात्र हाहा:कार उडाला आहे.
देशाच्या जवळपास ९५% भागात पोहोचलेला नैऋत्य मान्सून वादळे आणि मुसळधार पावसामुळे हाहा:कार माजवत आहे, तर काही भागांना पावसाची अद्यापही प्रतिक्षाच आहे. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, तसेच पूर्व भारतातील ओडिशा, पश्चिम गुजरातमधील गुजरात आणि मध्य मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या आणखी एका ढगफुटीत अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मुंबईत मुसळधार पाऊस असून, केवळ पाच तासांत ७० मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या परिसरावर ढग दाटून आले आहेत, परंतु, पावसाची तीव्रता रिमझिमपेक्षा जास्त नाही.
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, गेल्या २४ तासांत जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, आसाम, नागालँड आणि कर्नाटकच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. ओडिशा, गुजरात, अंदमान आणि निकोबार बेटे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टी (१२-२० सेमी) झाली आहे. दरम्यान, पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात ६०-१२५ किमी प्रतितास वेगाच्या वाऱ्यासह आलेल्या वादळांनी हाहा:कार माजवला आहे.
वादळाचा बसतोय मोठा तडाखा
ताशी ४०-६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, मराठवाडा आणि गुजरातच्या काही भागांनाही झोडपले आहे. हवामान विभागाने हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबईत पूरसदृश परिस्थिती
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अनेक भाग मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी पाच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. वांद्रे येथे सर्वाधिक ७३.८ मिमी पावसाची नोंद झाली.






