'पंतप्रधानांनी माझ्याही खुर्चीचा तेवढाच आदर करावा, जितका मी करते'; बंगालच्या वाघीणीने डरकाळी फोडली
Mamata Banerjee News: पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या खुर्चीचा, माझ्या पदाचा अनादर करतील आणि राज्यातील लोकांना ‘चोर’ संबोधून संपूर्ण राज्याचा अपमान करतील, अशी अपेक्षा मी कधीच केली नव्हती. “त्यांनी माझ्या खुर्चीचा आदर केला पाहिजे जसा मी त्यांच्या खुर्चीचा आदर करते.” अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पूर्व बर्दवान येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. तसेच आपल्या राज्याच्या अपमान खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, तरीही केंद्र सरकारने आमच्या राज्याचे निधीचे वाटप थांबवले, इतकेच नव्हे तर पश्चिम बंगालला ‘चोर’ म्हणत आमचा अपमानही केला. केंद्र सरकारकडून राज्याला दिला जाणारा निधी थांबवल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ‘भार’ पडला आहे . पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहारच्या ‘डबल इंजिन’ सरकारमधील भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या वेळी प्रवासी पक्ष्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये येतात आणि जातात. राज्य प्रशासनाने कल्याणकारी योजनांसाठी केंद्रीय निधी वापरण्याबाबत केंद्र सरकारच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत. तरीही तुम्ही निधीचे वाटप थांबवले आहे. हे सर्व कमी म्हणून की काय त्यांनी पश्चिम बंगालला ‘चोर’ असे संबोधत राज्याचा अपमानही केला. पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी १८६ केंद्रीय पथके पश्चिम बंगालमध्ये पाठवली होती, तरीही त्यांना काहीही सापडले नाही. सर्व प्रश्नांची उत्तरे देऊनही शून्य गुण मिळणे हे विद्यार्थी कसे स्वीकारू शकतो? आम्ही हा अपमान सहन करणार नाही.” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
२२ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ” भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि तृणमूल काँग्रेस हे एकमेकांचे समानार्थी आहेत. केंद्राने पश्चिम बंगाल सरकारला पाठवलेला पैसा लोकांपर्यंत पोहोचत नाही, परंतु तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते ते खातात.असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता.